जून महिना म्हणजे शाळेच्या नवीन वर्षांची सुरुवात. नवं दप्तर, नवा युनिफॉर्म, नवी वह्य़ा-पुस्तकं घेऊन शाळेत जायचं. नवा वर्ग कुठे असेल, नव्या बाई कशा असतील याची उत्सुकता असते. मित्र सुट्टीनंतर भेटणार म्हणून आनंदही असतो. मुलांप्रमाणे पालकांचाही उत्साह ओसंडून वाहत असतो. विशेषत: ज्यांच्या मुलांचा शाळारंभ होणार असतो त्यांच्या बाबतीत हे दिसून येते. कारण मुलाच्या जन्माआधीपासूनच आपल्या मुलाने चांगल्या शाळेत जाऊन शिकून मोठे व्हावे आणि आयुष्यात चांगले यश प्राप्त करावे, असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस किंवा सरस्वतीच्या प्रांगणातले पहिले पाऊल हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. कारण त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीचा पाया इथे घातला जाणार असतो.

माजातील सर्वसाधारण मुलांच्या आणि पालकांच्या बाबतीत हे चित्र दिसून येते. पण विशेष मुले आणि त्यांची शाळा, त्यांचं शैक्षणिक वर्ष हेही नव्याने सुरू होणार असते. पण बऱ्याचदा पालक काहीसे गोंधळलेले असतात. आपल्या मुलाच्या बाबतीत शाळेची भूमिका आणि शाळेची आवश्यकता याचे चित्र बऱ्याचदा स्पष्ट नसते आणि ते साहजिकच आहे. आपणही विशेष मुले आणि पालक यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करू या. बऱ्याचदा मुलांमध्ये लहान वयात म्हणावा तसा वेगळेपणा दिसून येत नाही. त्यामुळे त्या टप्प्यावर बुद्धिमंदत्व जाणवत नाही, परंतु थोडी मोठी झाली आणि समवयस्कर मुलांबरोबर खेळू लागली किंवा शिशुशाळेत जाऊ लागली की मग उणिवा जाणवू लागतात. तरीही अजून पुढच्या मोठा शिशू किंवा पहिलीपर्यंत प्रयत्न केला जातो. तेव्हा मग त्याच्या वयाच्या मानाने आकलन, समज आणि समायोजन यांमधील उणिवा अधिक जाणवू लागतात आणि ती मागे पडू लागतात. मग हा दुसरा पर्याय शोधला जातो. तर काही वेळा नेहमीपेक्षा वेगळं मूल वाटलं तरी ती मोठी होईपर्यंत पालक त्या वेगळेपणाचा स्वीकार करू शकत नाहीत. आपल्या नशिबी का किंवा औषधोपचार करून काही चांगला बदल होईल म्हणून ही वाट बघितली जाते. एकंदरीतच विशेष मुलाचे वास्तव स्वीकारून त्याला तज्ज्ञ डॉक्टर किंवा इतर उपचारपद्धतींसाठी नेणे, त्याचे विविध प्रश्न/ समस्या आणि दैनंदिन जगणे आणि त्या जगण्याचे प्रश्न याला सामोरे जाणे सोपे नव्हे. कारण आपण फक्त कल्पना करू शकतो. जो ते अनुभवतो त्यालाच त्याची तीव्रता कळते. बहुसंख्य पालक हे मानसिकरीत्या कोलमडून जाऊन पुन्हा आपल्या मुलासाठी उभे राहिलेले असतात, किंवा उभे राहायचा प्रयत्न करीत असतात. योग्य वयात विशेष मुलाला शाळेत घालणाऱ्या पालकांचे प्रमाण तुलनेने तसे कमीच आहे आणि विशेष शाळा ही कमीच आहेत. या पालकांना बऱ्याचदा आपल्या मुलाच्या मानसिक अपंगत्वाविषयीदेखील योग्य माहिती मिळालेली नसते. त्यांच्या शंकांचे नीट निरसन झालेले नसते. त्यामुळे विशेष शाळा, त्यातील दिले जाणारे शिक्षण आणि त्या शिक्षणाचे उद्दिष्ट याचीही माहिती नसते. बऱ्याच पालकांना आपल्या मुलांमध्ये आमूलाग्र बदल होईल तो इतर मुलांसारखा होईल असेही वाटते. एकंदरीतच शाळेत येणारे प्रत्येक विशेष मूल जसे वेग़ळे असते (कारण त्याच्या मतिमंदत्वामध्येही प्रकार असतात) त्याचप्रमाणे प्रत्येक पालकही वेगळा असतो. खरे तर आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक इ. अनेक गोष्टींवर पालकांची आणि विशेषत: स्त्री पालकांची मानसिकता अवलंबून असते. घरात विशेष मूल जन्माला आल्यावर त्याला वाढवणे हे एक आव्हान असते. कारण प्रत्येक दिवशी एका नव्या प्रश्नाला सामोरे जावे लागते. या प्रक्रियेत घरातल्या सदस्यांचे आणि विशेषत: पतीचे सहकार्य आणि खंबीर, आश्वासक मानसिक आधार मिळाला तर मतिमंदत्वाच्या वास्तवाला सामोरे जाणे तुलनेने काहीसे सोपे होते. नाही तर आपल्याच घरी असे का यामध्येच बराच काळ जातो. माणसाला मग आशा असतेच. त्यामुळे कोणी काही उपाय सुचवले तरी ते करून मुलाच्या स्थितीत बदल होण्याची ही आशा बाळगली जाते. काही काळाने हाती काही लागत नाही याची जाणीव होत जाते. ज्यांचे शालेय शिक्षणही पूर्ण झालेले नसते ते तर पूर्णपणे गोंधळून जातात. अशा तऱ्हेने हा टप्प्याटप्प्यांचा प्रवास होत असतो आणि प्रत्येक टप्प्यावर दु:ख, नैराश्य, काही वेळा उपेक्षा, हेटाळणी इ. विविध नकारात्मक भावनांचाच स्वीकार करावा लागतो. प्रयत्न करूनही मिळणारे यश हे अगदीच माफक किंवा बऱ्याचदा महिनोन्महिने वाट बघावी लागते. हे वास्तव स्वीकारणेही पालकांसाठी सोपे नसते. आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो तेव्हा प्रत्येक वर्षी त्याची प्रगती होणार आहे याची आपल्याला खात्री असते. त्यामुळे आपण जे प्रयत्न करणार आहोत त्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे हे पक्के माहीत असल्याने प्रयत्न करण्यासाठी एक उत्साह असतो, उमेद असते. या विशेष मुलांच्या वाढीचे टप्पे विलंबाने असतात. प्रत्येक टप्पा येण्याची वाट पाहावी लागते आणि तो टप्पा कधी येईल त्याचीही खात्री नसते, त्या टप्प्यावर मिळणारे यश अथक परिश्रमांच्या तुलनेत माफक असते. त्यामुळे नाउमेद, निराश न होता त्या मुलाच्या विकसनाच्या दृष्टीने तज्ज्ञांनी सांगितलेले प्रयत्न सातत्याने करत राहावे लागते. अशा प्रकारच्या अनेक समस्या, अडीअडचणींना सामोरे जात, अखेर (काही अपवाद सोडल्यास) बहुसंख्य पालक (विशेषत: कष्टकरी वर्गातील) विशेष शाळेकडे आलेले असतात. तुम्हा-आम्हा सर्वानाच आपल्या अडीअडचणीतून बाहेर पडायचे असते आणि तेही अगदी लवकरात लवकर. बरेचसे पालकही याच अपेक्षेने शाळेकडे पाहतात की आपल्या मुलामध्ये शाळा आपल्याला अपेक्षित आहे तसा बदल घडवून आणणार आहे.
ठाणे शहरातील विशेष मुलांच्या पालकांसाठी ठाणे महानगरपालिका संचालित धर्मवीर आनंद दिघे जिद्द विशेष शाळा हे एक मोठे आशास्थान आहे. जून महिन्यात सुरू होणारे नवे शैक्षणिक वर्ष, मुलांचा शाळारंभ याविषयी, विशेष मुलांच्या पालकांचा दृष्टिकोन याविषयी मुख्याध्यापिका अर्चना शेटे म्हणतात की, नवी शाळा किंवा मुलाचे नवे शैक्षणिक वर्ष, त्यासाठी केली जाणारी जोरदार तयारी हे सर्वसाधारणपणे दिसून येणारे चित्र आहे. पण इथे येणारा बहुधा प्रत्येक पालक हा अनेक अनुभवांना सामोरं जात, मानसिक आघात झेलत आलेला असतो. त्यामुळे त्याच्या मनावरचा ताण, निराशा, दु:ख आणि मुलाच्या मानसिक किंवा शारीरिक अपंगत्वासोबत आयुष्यभर जगायचं आहे हे शल्य याची तीव्रता कमी व्हायला हवी असते आणि कुठेतरी आधार हवा असतो. बहुतेकजण संभ्रमावस्थेत असतात आणि त्यामुळे चाचपडत असतात. ते विशेष शाळेकडे आणि आमच्याकडे त्या दृष्टीने पाहतात. त्यामुळे इथे येणारे प्रत्येक मूल त्याच्या अपंगत्वानुसार जसे वेगळे असते (आणि ते खरोखरच वेगळे असते) तसा प्रत्येक पालक हा वेगळा असतो. इथे येणाऱ्या, नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रत्येक मुलाला समजून घ्यावे लागते. कारण ते स्वत:ला व्यक्त करू शकत नाही जसे इतर मुले समर्थपणे करतात त्याप्रमाणे. त्यामुळे जसा मुलाला शाळेत रुळायला वेळ द्यावा लागतो त्याचप्रमाणे पालकाची मन:स्थिती जाणून घेऊन पालकांनाही विशेष शाळा आणि शाळेची उद्दिष्टे समजावून सांगायला बराच काळ जातो. पण इतर समदु:खी पालक जवळून पाहिल्यावर त्यांच्या दु:खाची तीव्रता कमी होण्यास, एकमेकांशी संवाद साधण्याने अनुभवांची देवाणघेवाण होण्यास प्रारंभ होतो. त्यामुळे फक्त विशेष मुलांचाच नव्याने प्रवेश नसतो तर त्यांच्या पालकांचाही या अनुभवांच्या शाळेत नव्याने प्रवेश असतो. त्यामुळे हा विशेष मुले आणि पालकांचा शाळारंभ असतो.