ठाणे : राष्ट्रीय तसेच राज्यस्तरिय शाळांच्या फुटबॉल स्पर्धा जिंकण्यासाठी काही शाळांकडून स्पर्धांमध्ये नागालँड, मणिपूरमधील खेळाडूंना बोलावून तसेच त्यांचे वयोगट कमी दाखवून त्यांना स्पर्धांमध्ये उतरविले जात असल्याचा आरोप केला जात आहे. नवी मुंबईतील वाशी येथील शाळेच्या पालकांनी या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. या शाळेतील विद्यार्थी एका राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यावेळी प्रतिस्पर्धी शाळेच्या विद्यार्थांच्या वयोगट आणि संबंधित खेळाडू परराज्यातील असल्याच्या मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या संदर्भाच्या तक्रारी पालकांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेत नवी मुंबईतील फादर ॲग्नल मल्टीपर्पज शाळेच्या विद्यार्थ्यांनी १५ खालील वयोगटातील स्पर्धेत सहभाग घेतला होता. मुंबई विभागातील स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर विद्यार्थ्यांची स्पर्धा पुण्यातील बालेवाडी येथे झाली. परंतु या स्पर्धेत त्यांचा कोल्हापूर येथील एका शाळेच्या संघाने पराभव केला. असे असले तरी प्रतिस्पर्धी संघाचे विद्यार्थी नागालँड आणि मणिपूर राज्यातील असल्याचा संशय संघातील नवी मुंबईतील शाळेच्या विद्यार्थी- पालकांना होता. प्रतिस्पर्धी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये १५ पैकी १२ खेळाडू हे बाहेरील राज्यातले आहेत. तसेच या खेळाडूंचे वयोगटही अधिक असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या विद्यार्थ्यांचे बनावट आधारकार्ड तयार केले जातात. तसेच त्यांना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी शाळेमध्ये प्रवेश दाखले दिले जातात असा आरोप पालकांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी समितीकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केला आहे. परंतु त्याचे ठोस उत्तर मिळाले नाही असा आरोपही पालकांनी केला आहे.
स्पर्धा जिंकण्यासाठी बाहेरील राज्यातील खेळाडूंना आणून खेळविले जात आहे. हा राज्यातील मुलांवर अन्याय आहे. दुसरे म्हणजे, या मुलांच्या वयोमर्यादेविषयी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सरकारने या प्रश्नाविषयी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. आम्ही राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार दिली आहे. तसेच न्यायालयातही धाव घेणार आहोत. – पी.आर. मोडक, पालक प्रतिनिधी, फादर, ॲग्नल मल्टीपर्पज शाळा, वाशी.
हेही वाचा…छताचे प्लास्टर अंगावर पडून मुलाचा मृत्यू
या संदर्भात क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता, पालकांच्या तक्रारीनंतर आम्ही संबंधित विद्यार्थ्यांची तपासणी केली. या स्पर्धेत नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला.