हाताशी गुण आणि अंगी गुणवत्ता असतानाही केवळ माहिती नसल्यामुळे करिअरच्या नवनव्या आणि यशस्वी मार्गापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ठाण्यात गुरुवारी ‘यशाचा मार्ग’ गवसला. ‘सॉफ्ट स्किल्स’ म्हणजे काय? ‘अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट’ कुठे करायची? दहावी-बारावीनंतर कोणती शाखा निवडू? असे अनेक प्रश्न घेऊन ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा सभागृहात पार पडलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य उत्तरे मिळाली. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस चालणाऱ्या या करिअरविषयक मार्गदर्शन कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि पालकांची झुंबड उडाली होती.
विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यक्रमाला तुडुंब प्रतिसाद मिळाल्यानंतर गुरुवारी ठाण्यातही त्याची पुनरावृत्ती पाहावयास मिळाली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गुरुवारी सकाळपासूनच टिपटॉप प्लाझा सभागृहाबाहेर विद्यार्थी आणि पालकांची गर्दी जमू लागली होती. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी चौधरी यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना आलेले अनुभव उपस्थितांपुढे मांडले. तसेच करिअरविषयक मार्गदर्शनही केले. कार्यक्रमातील प्रत्येक सत्रात पालक व विद्यार्थ्यांनी आपले शंकानिरसन केले. सत्र संपल्यानंतरही मधल्या वेळेत वक्त्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली जात होती. वक्तेही विस्तृतपणे प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देत होते.
मार्गदर्शन कार्यक्रमासोबतच या ठिकाणी शैक्षणिक संस्थांच्या प्रदर्शनाचाही विद्यार्थी व पालकांनी लाभ घेतला. करिअर निवडीचे नियोजन व वेगवेगळ्या संधी जाणून घेतल्यावर थेट प्रदर्शनात जाऊन इच्छित महाविद्यालय व शिक्षण शाखेची माहिती घ्यायला मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी आनंद व्यक्त केला.   विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
मी सध्या बारावीत असून पुढील शिक्षणासाठी महाविद्यालय व शाखा निवडण्यासाठी नेमके काय करावे लागेल, याची माहिती ‘मार्ग यशाचा’ कार्यक्रमातून मिळाली. माझ्या व माझ्या पालकांच्या व्यक्तिगत शंकाही वक्त्यांनी सोडविल्याबद्दल मला करिअर निवडीसाठी याचा फायदा झाला आहे.
चिंतन कर्णिक, ठाणे

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमातील पहिल्या वक्त्या नीलिमा आपटे यांच्या व्याख्यानामुळे करिअर निवडताना कोणत्या चुका करू नये आणि कोणती काळजी घ्यावी याची जाणीव झाली. त्यामुळे या कार्यक्रमाच्या मला मिळालेल्या अनुभवावरून आता मी पुढील शिक्षण निवडणार आहे.
स्मित ठाकूर, न्यू पनवेल</strong>

या कार्यक्रमातील वक्त्यांच्या मार्गदर्शनाने करिअरच्या नव्या वाटा समजल्या आहेत. यापूर्वी वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी आदी शाखांचीच माहिती होती. परंतु, या कार्यक्रमात मला नव्या शिक्षणक्रमांची माहिती मिळाली. त्यामुळे माझे पुढील करिअर निवडताना मी काळजी घेणार आहे.
दुर्वा म्हामुणकर, मुलुंड

पालकांचे मनोगत
‘लोकसत्ता’ने एकाच छताखाली करिअरविषयक संपूर्ण माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर निवडीचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे या उपक्रमाबद्दल लोकसत्ताचे मन:पूर्वक आभार.
– मेधा एकबोटे, ठाणे</strong>

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमात अनेक गोष्टींची माहिती मिळाली.  गौरी खेर यांचे सॉफ्ट स्किल्सबद्दलचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी अत्यंत मोलाचे असून त्याचा सकारात्मक परिणाम त्यांनी निवडलेले करिअर निभावताना होणार आहे.
– दीपाली म्हैसकर, ठाणे

मुलांना करिअरची निवड करण्यासाठी पालकांचे मार्गदर्शन व पालकांशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे. याची जाणीव पालकांना असली तरी हल्लीचे विद्यार्थी आपला मित्र कुठे अ‍ॅडमिशन घेणार यावर आपल्या करिअरचा निर्णय घेऊ लागल्याने त्यांच्या मनात गोंधळ होतो. परंतु, पालकांशी पाल्याने याबाबत संवाद साधल्यास करिअर निवडीचा प्रश्न त्याच्यासाठी सोपा जाईल, ही बाब वक्त्यांनी आजच्या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांच्या नजरेत आणून दिली.      – निशिकांत जंगले, डोंबिवली