scorecardresearch

अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्यास पालकांवर होणार कारवाई; डोंबिवली वाहतूक विभागाचा इशारा!

५ ते १० हजार रुपयांपर्यंतचा दंड देखील यापूर्वी पालकांकडून आकारण्यात आलेला आहे

(संग्रहीत छायाचित्र)

डोंबिवलीतील विविध रस्त्यांवर सध्या अनेक अल्पवयीन मुले दुचाकी वाहने चालवित आहेत. एका दुचाकीवर तीन जण बसून नियमबाह्य प्रवास करत आहेत. अशा दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर सोमवारपासून कारवाई करण्याचा निर्णय डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घेतला आहे.

दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांना गस्तीवरील वाहतूक पोलिसांनी अडवले आणि त्यांची चौकशी केली तर या मुलांकडे कोणतीही उत्तरे नसतात. त्यांच्याकडे वाहनाची कागदपत्रेही नसतात. आई-वडील कामाला गेले आहेत, त्यांच्या नकळत दुचाकीची चावी घेऊन दुचाकी चालवत असल्याची उत्तरे या अल्पवयीन चालकांकडून दिली जातात, असे पोलीस निरीक्षक गित्ते यांनी सांगितले.

पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवावे, वाहतूक नियमांचे कोणीही उल्लंघन करू नये, अशा वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत. तरीही अल्पवयीन मुले दाद देत नसल्याने त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

१८ वर्षाखालील मुले सरार्सपणे वाहन चालवताना आढळून येत आहेत. त्यामुळे वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलिसांकडून या मुलांच्या पालकांना वाहतूक विभागाच्या कार्यालयात बोलवून घेतले जाते आहे. त्यांच्या पाल्याने केलेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी ५ ते १० हजार रुपयांपर्यंत दंड देखील यापूर्वी पालकांकडून आकारण्यात आलेला आहे. या मुलांनी असा अपराध करू नये, म्हणून त्यांचे समुपदेशन देखील केले जात आहे. जे पालक आपल्या १८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यासाठी देत असती त्यांना यापुढील कारवाईसाठी सामोरे जावे लागणार असल्याचे डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

चालक परवाना, वाहनाची कागदपत्रे सोबत नसताना दुचाकी चालवल्यास वाहतूक विभागाकडून कारवाई होते. अल्पवयीन मुलाने वाहन चालवल्यास त्याच्या पालकांवर कारवाई होते, याची जाणीव पालकांनी आपल्या मुलांना करून द्यावी असे आवाहन देखील डोंबिवली वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parents will be prosecuted for allowing minors to drive dombivli transport department warns msr

ताज्या बातम्या