पुढील १५ दिवस दंड आकारणीऐवजी वाहनचालकांसोबत संवाद

नौपाडा परिसरातील पार्किंगला शिस्त लागावी यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी आखलेले नवे धोरण वाहनचालकांच्या फारसे अंगवळणी पडलेले नाही. या धोरणानुसार दुपारी तीनपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला तर तीन वाजेनंतर उजव्या बाजूस वाहने उभी करण्यास परवानगी दिली जात आहे. दोन दिवसांपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने वाहनचालकांची मात्र भंबेरी उडत आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांनी पुढील १५ दिवस या निर्णयाची अंमलबजावणी करताना वाहनचालकांसोबत संवादाची भूमिका घेतली आहे. त्याच वेळी या निर्णयाचे गांभीर्य चालकांच्या लक्षात यावे, यासाठी काही प्रमाणात दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे.

ठाणे शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौपाडा भागात वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोठय़ा प्रमाणात वाहने उभी केली जातात. यामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सम-विषम तारखांचे पार्किंग रद्द करून त्याऐवजी दुपारी तीन वाजेपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला तर दुपारनंतर रस्त्याच्या उजव्या बाजूला वाहने उभी करण्याचे नवे धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे.

पंधरा दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेले हे धोरण आता कायमस्वरूपी करण्यात आले आहे. असे असले तरी नेहमीच्या सवयीप्रमाणेच अनेक चालक पार्किंगच्या जागेव्यतिरिक्त तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करीत आहेत. मात्र अशा चालकांवर थेट कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी त्यांना सतर्क करून इशारा देण्याची भूमिका घेतली आहे.

या धोरणाबाबत वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पार्किंगव्यतिरिक्त जागेवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर मोठय़ा प्रमाणात अजून कारवाई सुरू केलेली नाही, असेही नौपाडा वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कवियत्री गावित यांनी सांगितले.

या धोरणाच्या जनजागृतीसाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले असून त्या ठिकाणी वाहने उभी करण्याची वेळही देण्यात आली आहे. तसेच या धोरणानुसार वाहतूक पोलिसांनी पार्किंगव्यतिरिक्त जागेवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.