scorecardresearch

‘विवियाना’शेजारी वाहनतळ की रुग्णालय?

ठाणे येथील माजिवाडा भागात मुंबई-नाशिक महामार्गालगत पालिकेने बहुमजली वाहनतळ उभारले आहे.

आमदार प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे शिवसेनेत विसंवादाचा नवा अंक

ठाणे : ठाण्यातील विवियाना मॉललगत उभारण्यात आलेल्या वाहनतळाच्या जागेत कायमस्वरुपी रुग्णालय उभारण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना तसेच प्रशासनाच्या हालचाली सुरू असताना स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी मात्र या जागेचा वापर वाहनतळासाठीच केला जावा अशी आग्रही भूमिका महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात मांडली आहे. यावरून शिवसेनेतील विसंवाद पुन्हा एकदा उघड झाला आहे. या जागेत रुग्णालय उभारण्याचा एक प्रस्तावही यापूर्वी सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसारच हा प्रस्ताव मंजूर झाल्याची चर्चा असताना सरनाईक यांनी मात्र नेमकी उलट भूमिका घेतल्याने शिवसेनेतील एक मोठा गट अवाक झाला आहे.

ठाणे येथील माजिवाडा भागात मुंबई-नाशिक महामार्गालगत पालिकेने बहुमजली वाहनतळ उभारले आहे. करोना काळात रुग्ण उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. यामुळे महापालिकेने वाहनतळाच्या जागेत ११०० खाटांचे तात्पुरते करोना रुग्णालय उभारले होते. करोना साथ कमी झाल्यानंतर या जागेत खासगी संस्थेच्या माध्यमातून मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात प्रस्तावित केले होते. तत्पूर्वी सत्ताधारी शिवसेनेने सर्वसाधारण सभेत यासंबंधीच्या एका प्रस्तावालाही मान्यता दिली होती. प्रशासकीय अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करून स्थायी समितीने त्यास मंजुरीही दिली आहे. यामुळे या जागेत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू होण्याची चिन्हे आहेत. या जागेत कोवीड रुग्णालय उभारताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे येथे कायमस्वरुपी रुग्णालय उभारणीसाठी शिंदे आग्रही असल्याची चर्चा आहे. असे असताना शिवसेनेचे आमदार सरनाईक यांनी या ठिकाणी वाहनतळच उभारले जावे अशी भूमिका घेतली आहे.

सरनाईकांचा आयुक्तांना पत्राद्वारे आंदोलनाचा इशारा

सरनाईक यांनी यासंबंधी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना पत्र पाठविले आहे. पोखरण रोड क्रमांक १ व २, सेवा रस्ते या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था नाही. तसेच वर्तकनगर, लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, शिवाईनगर, गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा व लक्ष्मी-चिराग नगर या परिसरामध्ये रिक्षा, रहिवाशांची वाहनेही रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात. त्याचप्रमाणे विवियाना मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या आणि ज्युपिटर रुग्णालयामध्ये रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची वाहने सेवा रस्त्यावर उभ्या केल्या जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. ही समस्या सोडविण्यासाठी वाहनतळाच्या उभारणीसाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शेठ ग्रुपच्या विकास प्रकल्पामध्ये बहुमजली वाहनतळ उभारण्यासाठी मान्यता दिली होती, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.  पालिकेला

रुग्णालय निर्माण करायचे असेल तर त्यासाठी घोडबंदर भागातील आरक्षित भूखंड ताब्यात घ्यावेत. परंतु, एखाद्या संस्थेच्या आर्थिक फायद्याकरिता इतर बाबींसाठी करून आत्मघातकी निर्णय घेतला असेल तर त्यास तीव्र विरोध राहील. वेळप्रसंगी आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parking lot viviana hospital moments administration ysh

ताज्या बातम्या