स्थानक परिसरात ५०० मीटर परिघात ‘नो पार्किंग’

मुंबई महानगर क्षेत्रातील ३० वर्षांच्या वाहतूक व्यवस्थापनासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तयार केलेल्या आराखडय़ात वाहतूक साधनांचे एकात्मीकरण करण्याचे नियोजन केले आहे.

‘एमएमआरडीए’च्या वाहतूक व्यवस्थापन आराखडय़ातील नियोजन

जयेश सामंत, सागर नरेकर

ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रातील ३० वर्षांच्या वाहतूक व्यवस्थापनासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तयार केलेल्या आराखडय़ात वाहतूक साधनांचे एकात्मीकरण करण्याचे नियोजन केले आहे. तसेच मेट्रो, मोनो, रेल्वे स्थानकांच्या ५०० मीटर क्षेत्रात रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करण्याखेरीज स्थानिक क्षेत्र रहदारी सुधारणा योजना तयार करण्याचे सूतोवाचही या आराखडय़ात करण्यात आले आहे.

 गेल्या काही वर्षांत मुंबई, उपनगरांमध्ये झालेल्या नागरीकरणामुळे सर्वच शासकीय संस्थांचे वाहतूक नियोजन कोलमडले आहे. झपाटय़ाने वाढलेल्या लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधांवर त्यांचा ताण येऊ लागला आहे. त्यामुळे येत्या तीस वर्षांमध्ये मुंबई महानगर क्षेत्रात वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी एमएमआरडीएने सर्वंकष वाहतूक अभ्यास अहवाल नुकताच सादर करून त्याला मंजुरी दिली. येत्या तीस वर्षांत विविध टप्प्यांमध्ये अनेक महत्त्वांकाक्षी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांसोबतच वाहतूक व्यवस्थापनासाठी सर्वच वाहतूक साधनांच्या एकत्मीकरणावर भर देण्याचेही या अहवालात सुचवण्यात आले आहे.

नागपाडा आणि वांद्रे येथे सुधारणा करण्यात आलेल्या स्थानकांच्या धर्तीवर महानगर प्रदेशातील इतर स्थानकांची सुधारणा करण्याचीही सूचना या अहवालात देण्यात आली आहे. स्थानिक संस्थांच्या मदतीने अ‍ॅडेप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल यंत्रणा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य  संस्था, रेल्वे, मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने स्थानिक क्षेत्र रहदारी सुधारणा योजना तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे उपायांमध्ये सुचवण्यात आले आहे. मेट्रो रेल्वे, मोनो रेल्वे, उपनगरीय रेल्वे, एलआरटी, बीआरटीएस स्थानकाच्या परिसरातील रस्त्यावर ५०० मीटपर्यंत रस्त्यांवर वाहतळास बंदीचाही उपाय सुचवण्यात आला आहे. तर वाहतूक साधने एकमेकांना जोडली जावीत म्हणून मेट्रो स्थानकाशी इतर वाहतूक साधनांच्या एकात्मीकरणावर भर देण्याचे नियोजन आहे.

विशेष यंत्रणेची गरज

विविध प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक साधनांच्या परिवहन केंद्रित विकासासाठी विशेष यंत्रणेची स्थापना करण्यास मान्यता देण्यात यावी, असाही प्रस्ताव एमएमआरडीएने मंजूर केला आहे. ज्यामध्ये प्राधिकरण, सिडको, नागरी स्थानिक संस्था तसेच विशेष नियोजन प्राधिकरणाचा समावेश असेल. 

आराखडय़ातील अन्य मुद्दे

  • वाहतुक एकात्मीकरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व स्थानिक संस्थांमध्ये कायमस्वरूपी परिवहन आणि वाहतूक विभाग उभारण्याची गरज.
  • समर्पित एकत्रीकृत मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणासाठी स्वतंत्र प्रशासन संरचना तयार करण्याची सूचना.
  • आंतरराज्य बस टर्मिनल, शहरी बस टर्मिनल, जल वाहतूक टर्मिनल, ट्रक टर्मिनल, रेल्वे टर्मिनल, समर्पित बस मार्गिका, जलद बस परिवहन सेवा यांचा विकास अपेक्षित.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Parking meters station area ysh

ताज्या बातम्या