राजकीय पक्षांना निवडणूक निधी;

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी डायरीत नोंदवून ठेवलेल्या काही आर्थिक व्यवहारांच्या सविस्तर नोंदी मिळविण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. परमार यांनी निवडणूक निधीच्या नावाखाली शहरातील काही सर्वपक्षीय बडय़ा नेत्यांना सढळ हस्ते वाटप केलेल्या लाखो रुपयांच्या मदतीचा सविस्तर तपशील पोलिसांच्या हाती लागला आहे.
गेल्या वर्षी प्राप्तिकर विभागाने परमार यांच्याकडून ही डायरी जप्त केली होती. त्यातील तपशिलात राज्य सरकारचा नगरविकास विभाग, म्हाडा आणि ठाणे महापालिकेतील शहरविकास विभागात पैसे दिल्याचाही उल्लेख आढळून आला आहे. या तपशिलात काही राजकीय नेत्यांच्या नावांचा अगदी स्पष्टपणे, तर काहींचा ‘सांकेतिक शब्दां’मध्ये उल्लेख असल्याची माहिती ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. या नेत्यांशिवाय परमार यांनी व्यवहार केलेल्या व्यक्तींच्या अनेक नोंदी पोलिसांकडे असून तब्बल १९ कोटी रुपयांचे व्यवहार पोलिसांनी तपासासाठी घेतले आहेत.
गेल्या वर्षी प्राप्तिकर विभागाने सूरज परमार यांचे कार्यालय तसेच घरावर छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये परमार यांनी आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवलेली डायरी या विभागाने जप्त केली होती. परमार आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करताना पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा नोंद केला आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून पोलिसांनी हस्तगत केलेल्या परमार यांच्या डायरीतील आर्थिक तपशिलांकडे महत्त्वाचा पुरावा म्हणून पोलीस पाहत असून, या नोंदींच्या आधारे काही बडे राजकीय नेतेही चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांना मिळालेल्या तपशिलात ठाण्यातील शिवसेनेच्या दोन बडय़ा नेत्यांच्या नावे निवडणूक निधीसाठी दहा लाख रुपयांची रोकड वळती करण्यात आल्याचा उल्लेख आहे. याशिवाय राष्ट्रवादीचा एक बडा नेता, आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेला एक नगरसेवक, काँग्रेस आणि आरपीआयचे महापालिकेतील प्रत्येकी एक ज्येष्ठ नगरसेवक, मनसेचा ठाणे शहरातील एक माजी वरिष्ठ पदाधिकारी अशा नेत्यांच्या नावांचा प्रत्यक्ष आणि ‘सांकेतिक शब्दां’मध्ये उल्लेख आहे. या सर्व नावांपुढे ‘निवडणूक निधी’ असा उल्लेख असून, पाच ते दहा लाखांची रोकड दिल्याची नोंद आढळून आली आहे.

डायरीतील तपशिलात नगरविकास, महापालिकेचा शहरविकास अथवा म्हाडातील कोणत्याही अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख नसला तरी विभागांच्या नावे लाखो रुपयांची रोकड दिल्याची स्पष्ट नोंद आढळून आली आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पक्ष आणि निधी

१० लाख – ठाण्यातील शिवसेनेचे दोन बडे नेते
५ लाख – राष्ट्रवादीचा एक बडा नेता

५ लाख – आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नगरसेवक
५ लाख -काँग्रेसचा ज्येष्ठ नगरसेवक

५ लाख -आरपीआयचा ज्येष्ठ नगरसेवक
५ लाख -मनसेचा माजी वरिष्ठ पदाधिकारी