ठाणे – मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी लोकलमधून काही प्रवासी पडून मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी दुपारी मुंब्रा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ४ वरील काही भाग खचला असल्याची घटना उघडकीस आली आहे. फलाटाला लागूनच रेल्वे प्रशासनाकडून बांधकाम सुरू असताना हा भाग खचला आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणारे १३ प्रवासी खाली पडले. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनवर प्रवासी संघटनांकडून जोरदार टीका करण्यात आली. प्रवासी संघटनांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप रेल्वे प्रशासनावर करत असतानाच मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांमधील फलाटांच्या दुरावस्थेबाबतही प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. असे असतानाचा आता अपघात घडलेल्या मुंब्रा स्थानकातील फलाट क्रमांक ४ चा एका बाजूचा भाग देखील खचला असल्याची घटना उघडकीस आली आहे. या फलाटाच्या बाजूलाच रेल्वे प्रशासनाकडून बांधकाम करण्यात येत आहे. हे बांधकाम सुरू असतानाच हा भाग खचला. यामध्ये फलाटावर बसविण्यात आलेल्या लाद्यांना तडे गेले आहेत. तर यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून स्थानक प्रशासनाकडून त्या भागात धोकापट्टी लावून तो भाग वापरण्यासाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
वापर नसल्याने दुर्घटना टळली
मुंब्रा रेल्वे स्थानकात जलद गाड्यांसाठी स्वतंत्र फलाट उभारण्यात आले आहेत. मात्र येथून जाणाऱ्या गाड्यांची संख्या अगदी तुरळक असल्याने या फलाटावरील प्रवाशांची वर्दळ अत्यंत कमी असते. यामुळे फलाट खचताना त्या भागात कोणीही प्रवासी उभे नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.