वर्षांऋतूचे आगमन झाल्यावर आपल्याला निसर्गाचे एक सुंदर रूप अनुभवता येते. आणि ही हिरवी शाल पांघरलेला निसर्ग पाहणे हा एक सुंदर अनुभव असतो. कारण हिरव्या रंगाच्या अनेक छटा आपल्याला अनुभवता येतात. खरंतर सृष्टीचे नयनमनोहर सौंदर्य अनुभवता येते असे म्हणणे अधिक योग्य होईल. पण अशा या निसर्गाचे जतनसंवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. याचा आपल्याला कुठेतरी विसर पडला आणि त्यामुळेच आज साऱ्या जगासमोर पर्यावरणविषयक अनेक गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत.
खरंतर भारतीय संस्कृतीचा विचार केला तर निसर्गाविषयी, निसर्गातल्या प्रत्येक घटकांविषयी स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण आपल्याला मिळते. विविध सणउत्सवांच्या माध्यमातून निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व विशद करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न यामधून दिसून येतो. म्हणूनच निसर्गातील वृक्षवेली, पशू-पक्षी, नदी, समुद्र यांचे पूजन आपण करतो. आपल्या संतमहात्म्यांनीदेखील सातत्याने निसर्गाचे महत्त्व सामान्यजनांना पटवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पण आपले जीवन अधिकाधिक सुखासीन करण्याच्या नादात आपण निसर्गाची अपरिमित हानी केली आणि म्हणूनच आज आपण एका अवघड वळणावर उभे आहोत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पर्यावरण दक्षता मंचसारख्या संस्था अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला (सर्व वयोगटातील व्यक्ती) निसर्गाजवळ नेण्याचा आणि त्याद्वारे जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने करीत असतात.
असे म्हटले जाते की लहान वयात केलेले आचारविचारांचे संस्कार कायमस्वरूपी असतात. आणि म्हणूनच शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेकविध वैशिष्टय़पूर्ण उपक्रम सातत्याने राबवले जातात. खरंतर यामधूनच विद्यार्थ्यांना निसर्गाजवळ नेणे आणि त्यांच्यात एक Y bonding तयार करणे शक्य होते. वर्षभरातील विविध उपक्रमांपैकी निसर्गमेळा हा एक अभिनव उपक्रम आणि यंदाचे हे सोळावे वर्ष आहे. २-३ स्पर्धाच्या रूपात या उपक्रमास प्रारंभ झाला. (आवाजावरून पक्षी ओळखणे, झाडे ओळखा, टाकाऊतून टिकाऊ इ.) आणि अल्पावधीतच विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला. शाळेत जरी पर्यावरण विषय असला, तरी खरंतर हा विषय पुस्तकातून शिकण्यापेक्षा स्वत: अनुभवण्यात, समजून घेण्यात आणि निसर्गाशी जोडले जाण्यातच खरी मजा आहे. कारण शाळेत जो बोअिरग विषय वाटतो तो इथे खूप काही देणारा, अनुभवविश्व समृद्ध करणारा, जगण्याची नवी दृष्टी देणारा असतो.
यावर्षी निसर्ग छायाचित्रण, झाडे ओळखा, खजिन्याचा शोध, पॉवरपॉइंट स्लाइडच्या माध्यमातून सादरीकरण, चित्रकला, प्रश्नमंजुषा, पथनाटय़, टाकाऊतून टिकाऊ, पर्यावरणीय प्रकल्प प्रतिकृती अशा नऊ स्पर्धा आहेत. मुलांना निसर्गाचे महत्त्व कळायला हवे, आपण त्याचा नाश करता कामा नये, हे पटले पाहिजे आणि त्याची जपणूक करण्यासाठी खारीचा वाटा उचलायला पाहिजे हे मनावर बिंबले गेले पाहिजे, अशा व्यापक विचाराने स्पर्धाची आखणी केली जाते. १५ वर्षांनंतर अनुभवावरून दिसून येते की मुलांवर निसर्गसंस्कार होतात, मुलांना त्यांचे महत्त्व पटतं, ते त्याच्याशी जोडले जातात आणि ते अभ्यासही मनापासून करतात. स्पर्धाची तयारीही जीव तोडून करतात.
निसर्ग मेळ्याचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे दरवर्षी एक थीम असते. जे पक्षी, वन्यप्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांची प्रदर्शनी तयार केली जाते. त्यामध्ये त्यांचे प्रजनन. त्यांचे परिसंस्थेतील महत्त्व, त्याला कशापासून धोके आहेत आणि त्याचे जतन/संवर्धन अशा सर्व मुद्दय़ांवर प्रदर्शनी तयार केली जाते. आणि विद्यार्थी जिथे नावनोंदणी करतात त्या काऊंटरजवळ मांडली जाते. जेणे करून विद्यार्थ्यांचे चटकन लक्ष वेधले जाईल.
‘निसर्गमेळा’ या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे पर्यावरण दक्षता मंडळातर्फे सहभागी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही हे आवर्जून नमूद करण्याजोगे. दरवर्षी ५०च्या आसपास शाळा सहभागी होत असल्याने मोठय़ा शाळेच्या सहकार्याची अयोजनासाठी आवश्यकता असते. यावर्षी श्रीरंग महाविद्यालयाने स्पर्धेसाठी शाळा मोफत दिली आहे. प्रश्नमंजुषा (२ ऑक्टोबर रोजी जागतिक वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने हा निसर्गमेळा दरवर्षी आयोजित केला जातो हे विशेषत्वाने नमूद करण्याजोगे), पथनाटय़, टाकाऊतून टिकाऊ आणि पर्यावरणीय प्रकल्प प्रतिकृती या स्पर्धाचे आयोजन आणि बक्षीस समारंभ २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते दुपारी २.०० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
तात्कालीन पर्यावरणीय प्रश्नांविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या हेतूने सर्व स्पर्धाचे विषय ठरवण्यात आले आहेत. प्रश्नमंजुषा या स्पर्धेचा विषय पाणी आहे. पाण्याचे राष्ट्रीय स्रोत, प्रदूषण, त्यावरील उपाय व जलसंवर्धन इ. मुद्दय़ांवर आधारित ही स्पर्धा असणार आहे.
पथनाटय़ाचे विषय- टोलेजंग इमारतींचे पर्यावरणावर होणारे परिणाम, (२) नष्ट होत चाललेल्या पाणथळ जागा आणि (३) बाटलीबंद पाण्याच्या पर्यावरणीय समस्या. यावर आधारित ५ ते ७ मिनिटांचे पथनाटय़ विद्यार्थ्यांनी सादर करायचे आहे. टाकाऊपासून टिकाऊ ही स्पर्धा प्लॅस्टिकचा पुनर्वापर या विषयावर आधारित आहे, जेणेकरून मुलांवर वस्तूंचा पुनर्वापर हा संस्कार रुजावा हा उद्देश आहे.
पर्यावरणीय प्रकल्प प्रतिकृती- या स्पर्धेसाठी वर्षांजलसंधारण व हरित ऊर्जा हे विषय आहेत. या मॉडेल्सच्या स्पर्धेसाठी थर्मोकोलविरहित प्रतिकृती अपेक्षित आहेत. कारण थर्मोकोल विघटनशील नसून प्रदूषणकारक आहे.
याव्यतिरिक्त निसर्ग छायाचित्रण, झाडे ओळखा व खजिना शोध या स्पर्धा घनदाट झाडी असलेल्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. शहरी मुलांना वनस्पती आणि जंगलातील परिसंस्थेबद्दल माहिती नसते. म्हणूनच स्पर्धेच्या आधी वनस्पतीशास्त्रज्ञ त्याच ठिकाणी एक छोटय़ा निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करतात. यामध्ये मुलांना तेथील विशिष्ट वनस्पती आणि परिसंस्थेबद्दल माहिती करून दिली जाते व त्या माहितीच्या आधारित स्पर्धा घेतली जाते.
याच प्रमुख उद्देशाने खजिना शोध ही आगळीवेगळी स्पर्धा घेतली जाते. निसर्ग छायाचित्रण या स्पर्धेत इ.९वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात, तर वरील इतर स्पर्धामध्ये इ.७वी व ८वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यावर्षी चित्रकला स्पर्धा सहभागी शाळांमध्येच घेतली जाणार आहे. कारण स्पर्धेचा विषय आहे शाळेच्या परिसरातील निसर्ग. यामुळे शाळेच्या परिसरात निसर्ग किती प्रमाणात (वनस्पती, झाडे, त्यावरील कीटक, पक्षी इ.) अनुभवता येतो हे लक्षात येईल.
काळानुरूप पॉवरपॉइंट सादरीकरणाची स्पर्धाही घेतली जाणार आहे. त्याचे विषय असे आहेत- जैविक इंधन, स्मार्ट सिटीचे पर्यावरणावर होणारे परिणाम व कीटकांचे परिसंस्थेतील महत्त्व. या बाबींची थीम अंबोली रोड आहे. कारण तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
यावरून निसर्गमेळा या स्पर्धेचे वैविध्य मुलांना निसर्गाशी जोडण्यात यशस्वी होते. खरंतर पर्यावरण हा विषय शाळेतल्या चार भिंतीत, फळ्यावरील माहितीवरून शिकण्यापेक्षा स्वत: अनुभवण्यात, स्वत: समजून घेऊन शिकण्यासारखाच आहे. अशा उपक्रमांमधूनच भावी पिढी निसर्गाशी जोडली जाणार आहे.
संपर्कासाठी-०२२ २५३८०६४८, ९८६९०३३५८३,
हेमा आघारकर
ई-मेल : paryavaranshala@gmail.com