अडवणुकीचे थांबे – गावदेवी रिक्षा थांबा
पावलापावलांवर थांबे, रिक्षाचालकांची मुजोरी आणि अनधिकृत पार्किंगचा विळखा
ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर ही शहरे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढू लागली आहेत. येथील नागरिकरणाचा वेग लक्षात घेता या शहरांचा विस्तार पाहून खरे तर अंतर्गत आणि बाहय़ वाहतुकीचे ठोस असे नियोजन यापूर्वीच करणे गरजेचे होते, मात्र अरुंद रस्ते, फेरीवाल्यांनी बळकावलेले पदपथ, जागोजागी होणारी वाहतूक कोंडी आणि त्यातून मार्ग काढत इच्छित स्थळ गाठण्यासाठी धडपडणारा सर्वसामान्य प्रवाशी असेच चित्र या शहरांमध्ये वर्षांनुवर्षे नजरेस पडत आहे. पुरेशी बसव्यवस्था नसल्याने सार्वजनिक वाहतुकीसाठी रिक्षाशिवाय पर्याय नाही आणि रिक्षा गाठायची तर थांब्यावर मुजोरी, मनमानी, मानहानी सहन करत प्रवास करायचे हे लाखो प्रवाशांसाठी जगण्याचा भाग होऊन बसले आहे. ठाणे आणि आसपासच्या शहरांमधील अशाच अडवणुकीच्या काही थांब्यांची ही वृत्तमालिका आजपासून..
वाहनांनी भरून वाहणारा चिंचोळा रस्ता.. अरुंद रस्त्याच्या एका बाजूला तीन-तीन रिक्षा थांबे.. रस्त्याच्या अगदी मधोमध प्रवाशांना खाली उतरवणारे रिक्षाचालक.. त्यामुळे बसगाडय़ांचा होणारा खोळंबा.. वाहनाच्या गर्दीतून अगतिकपणे वाट काढणारे पादचारी.. वाहनांची कोंडी.. ठाणे रेल्वे स्थानक परिसराची धमनी समजल्या जाणाऱ्या गावदेवी नाक्यावर दररोज अशा प्रकारे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात असतो. स्थानकाच्या गर्दीतून वाट काढत येणाऱ्या महिला, तरुणी रिक्षा मिळावी यासाठी येथे अक्षरश: आर्जव करताना दिसतात. त्यांनाही मुजोरीच्या या थांब्यावर फार कुणी दाद देत नाही.
ठाणे रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर मीटर रिक्षाऐवजी शेअर रिक्षांचा पर्याय निवडायचा असल्यास ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला गावदेवी रिक्षा थांबा गाठावाच लागतो. गावदेवी परिसरातून कोणत्या ठिकाणी जायचे आहे, त्यासाठी प्रवाशाला तिथे जाणाऱ्या रिक्षांचे थांबे शोधावे लागतात. लोकमान्य, सावरकरनगर, वर्तकनगर, नितीन कंपनी, तीन हात नाका, पवारनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक रिक्षांचे थांबे या ठिकाणी आहेत.
शहराच्या विविध भागांतून रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना शिवाजी रस्त्यावरून सॅटिसखालील रिक्षा थांब्यापर्यंत पोहोचवणे अपेक्षित असले तरी हे रिक्षाचालक गावदेवीजवळ प्रवाशांना उतरवतात. गावदेवी परिसर म्हणजे अनधिकृत रिक्षा थांब्यांचे आगारच. या भागातून एका वेळेस चार प्रवाशांना बिनधास्त रिक्षात बसवले जाते. या थांब्यांवरून मीटरप्रमाणे जायचे असल्याचे सांगितल्यास रिक्षाचालक भाडे नाकारतात. रस्त्याच्या बाजूला सिमेंटचे पाइप टाकून रस्त्याचे दोन भाग केले गेले असून तेथे दोन थांबे बनविण्यात आले आहेत. गावदेवीकडून शिवाजी रस्त्याकडे जाताना जागोजागी पार्किंग करून ठेवलेल्या रिक्षा या भागातील बस थांब्यालाही अडथळे ठरू लागल्या आहेत. एरवी धडाकेबाज म्हणून ओळखले जाणारे महापालिका आणि वाहतूक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अडवणुकीच्या या थांब्यांवर उतारा शोधता आलेला नाही.