ठाणे – मुंब्रा येथील रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून १३ प्रवासी पडून त्यापैकी पाच प्रवाशांचा मृत्यु झाला, ही घटना दुर्देवी असून याला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांनी दिल्या आहेत. या अपघातानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून रेल्वे प्रवास कसा जीवघेणा झाला असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहेत.

कर्जत, कसारा हून मुंबईच्या दिशेने नोकरीसाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतू, या स्थानकातून एक ते दीड तासाच्या अंतराने लोकल गाड्या धावतात. त्यामुळे या लोकल गाड्यांमध्ये कायमच प्रवाशांची गर्दी असते. अशातच, सोमवारी मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक ३ आणि ४ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत आणि कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लोकल गाड्यामध्ये प्रथमदर्शनी दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना तसेच त्यांच्याकडील बॅगांचा धक्का लागून दोन्ही गाडीतील एकूण १३ प्रवासी गाड्यांमधून पडल्याची घटना घडली.

या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून या अपघाताला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. प्रवाशांकडून रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

वातानुकूलित रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करावा…

सकाळच्या गर्दीच्या वेळी वातानुकूलित रेल्वे गाड्या सोडल्या जातात. परंतू, प्रत्येकालाच या गाड्यांची तिकीट दर परवडणारे नसतात. म्हणून अनेकजण साध्या गाडीने प्रवास करतात. वातानुकूलित गाड्यांनी जास्त प्रवासी जात नाही. त्यामुळे स्थानकातील गर्दी कमी होत नाही. वातानुकूलित गाडी गेल्यानंतर १५ ते २० मिनिटाच्या अंतरानाने साधी गाडी येते. त्यात, प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे गर्दीच्या वेळा सोडल्या जाणाऱ्या वातानुकूलित रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

प्रवासी प्रतिक्रिया…

मी दररोज टिटवाळा ते सीएसएमटी पर्यंत प्रवास करतो. मुंब्र्यात जी घटना घडली ती अत्यंत चुकीची आहे. जे प्रवासी रेल्वेतून पडले यात त्यांची चूक नाही. प्रत्येकाला वेळेत नोकरीच्या ठिकाणी पोहचायचे त्यामुळेच अनेकजण कितीही गाडीत गर्दी असुदे ते रेल्वे गाडीला लटकट प्रवास करतात. यावर एकच पर्याय आहे की, रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली पाहिजे, असे एका प्रवाशाने सांगितले.

मुंब्र्यात रेल्वे गाडीतून काही प्रवासी पडले ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. रेल्वेचा प्रवास हा भितीदायक आहे. सकाळी घरातून निघणारा माणूस घरी येईल का याची शाश्वती नसते. गेले दहा वर्षे मी डोंबिवली ते सीएसएमटी प्रवास करत आहे. प्रवाशांची संख्या जास्त आणि रेल्वे गाड्या कमी अशी परिस्थिती आहे. या अशा अपघातांमुळे नोकरी करायची की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया लीना गोरे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली पाहिजे. तसेच वेळेत रेल्वे गाड्या सोडल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया शुभम आवारे यांनी दिली.