पनवेल, वाशी, भिवंडी गाठण्यासाठी रिक्षांची अचानक भाडेवाढ

राज्य परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपाचा फटका गुरुवारी प्रवाशांना बसला. बंदच्या तव्यावर पोळी भाजत रिक्षाचालकांनी प्रवाशांची यथेच्छ लूट केली. कल्याणहून वाशी तसेच पनवेल या मार्गावर एरवी रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करण्यास फारसे उत्सुक नसतात. एसटी सेवा बंद आहेत हे लक्षात येताच रिक्षाचालकांनी प्रवाशांकडे या मार्गाकरिता अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यास सुरुवात केली. कल्याण-पनवेल या मार्गावर रिक्षाचालक प्रति माणशी दीडशे ते दोनशे रुपये आकारत होते, तर वाशीसाठी दोनशे रुपयांचा आकार सांगितला जात होता. या ठाणे शहरावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

कल्याण बस डेपोमध्ये गुरुवारी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेस (इंटक) युनियनच्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांनी बस बंद आंदोलन पुकारले होते. पगारवाढीच्या मुद्दय़ावर बस बंद आंदोलन उभे राहिल्याने अन्य युनियननेही या संपाला पाठिंबा देत बस बंद आंदोलन यशस्वी केले. कल्याण येथून भिवंडी, पनवेल या ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. गुरुवारी सकाळी बस बंद आंदोलनामुळे या मार्गावरील बस रद्द करण्यात आल्या. याचा फटका सुमारे बाराशे प्रवाशांना बसला. कल्याणहून पनवेलला जाण्यासाठी प्रति माणशी दीडशे ते दोनशे रुपये, तर भिवंडीसाठी जाण्यासाठी प्रति माणशी पन्नास रुपये मोजावे लागत होते.

राज्यव्यापी बंदच्या पाश्र्वभूमीवर इंटक युनियनच्या कार्यकर्त्यांनी ठाणे तसेच कल्याणमधील विविध आगारांतील बसेसच्या टायरमधील हवा काढून आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. तसेच कल्याणजवळील काटई नाक्याजवळ बसच्या काचा फोडण्यात आल्या, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दुपारनंतर बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या. कल्याणात बंदचे परिणाम दिसून आले. कल्याणातील अनेक प्रवासी वाशी, पनवेल, भिवंडी या भागांत जाण्यासाठी राज्य परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करतात. त्यामुळे बंदचा नागरिकांना फटका बसला.