कल्याण- कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका बाहेरील रिक्षा वाहनतळावरून प्रायोगिक तत्वावर रिक्षेच्या एक ते दोन रांगा मीटर प्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्णय रिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. रिक्षा मीटरचा हा प्रायोगिक प्रयोग यशस्वी होण्यासाठी रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याची मागणी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण स्थानकातील अधिकाऱ्यांकडे केली.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण डोंबिवली पालिकेची कामे संथगतीने सुरू आहेत. या भागातील स्थलांतरित केलेले रिक्षा वाहनतळ, त्यामुळे रिक्षा चालकांना मुख्य रस्त्यावर उभे राहून प्रवासी वाहतूक करावी लागते. रांगेत रिक्षा मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळील बस आगारा समोरील रेल्वेच्या जागेत रेल्वे प्रशासनाने रिक्षा वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी कल्याण मधील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर, कार्याध्यक्ष संतोष नवले यांनी कल्याण रेल्वे स्थानक संचालक प्रकाश, स्थानक व्यवस्थापक जैन, पवन कुमार यांच्याकडे केली.

रेल्वे अधिकारी, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पेणकर यांनी संयुक्तपणे कल्याण रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी एसटी महामंडळाच्या बस आगारा समोरील जागेत येत्या १५ दिवसात कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातून कल्याण पूर्व भागाला जोडणार पूल उभारणीचे काम सुरू होणार आहे. या भागात रिक्षा वाहनतळ सुरू करणे शक्य होणार नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रिक्षा वाहनतळासाठी रेल्वे जागेत जागा उपलब्ध झाली असती तर सुमारे ३०० रिक्षा एका वेळी रेल्वेच्या वाहनतळावर उभ्या राहिल्या असत्या. रस्त्यावरील रिक्षा उभ्या राहण्याचे प्रमाण कमी झाले असते, अशी माहिती अध्यक्ष पेणकर यांनी दिली.

कल्याण रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर अनेक प्रवाशांना मीटर रिक्षेने प्रवास करायचा असतो. मीटर रिक्षेची वाहनतळावरील रांग माहिती नसल्याने प्रवासी रेल्वे स्थानक भागात रिक्षेसाठी भटकत राहतो. प्रवाशाला होणारा हा त्रास कमी होण्यासाठी रिक्षा वाहनतळावरील एक रांग प्रायोगिक तत्वावर मीटर प्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वाहनतळावर ३० रिक्षा मीटर प्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. अशाप्रकारे मीटर प्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा वाहनतळावर रिक्षा उपलब्ध आहेत. याची माहिती सतत रेल्वेने त्यांच्या ध्वनीक्षेपक यंत्रणेतून द्यावी. जेणेकरून प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर तात्काळ मीटर प्रमाणे रिक्षा सेवेचा लाभ घेता येईल, असा प्रस्ताव रेल्वे अधिकाऱ्यांना दिला आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी दिली.

मीटर प्रमाणे प्रवासी वाहतुकीला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत गेला तर ३० रिक्षांची संख्या प्रवासी गरजेप्रमाणे वाढविण्यात येईल. अधिकाधिक प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येईल. रेल्वेच्या सहकार्यामुळे प्रवाशांना मीटरप्रमाणे रिक्षा प्रवासी वाहतूक कोठे होते हे शोधावे लागणार नाही, असे पेणकर म्हणाले. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे पेणकर यांनी सांगितले. रेल्वे स्थानका बाहेरील खराब रस्ते, तुंबलेले पाणी, प्रावशांचे होणारे हाल याविषयी आपण लवकरच पालिका आयुक्तांची भेट घेणार आहोत, असे पेणकर म्हणाले.