लोकसत्ता खास प्रतिनिधी कल्याण- कोकण रेल्वे मार्गावरील पनवेल-कळंबोली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान शनिवारी दुपारी एक मालगाडी रुळावरुन घसरल्याने या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या विस्कळीतपणाचा सर्वाधिक फटका कोकणात जाणाऱ्या, येणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. तुतारी एक्सप्रेसमध्ये शनिवारी रात्री १२ वाजता बसलेले प्रवासी अद्याप तळोजा रेल्वे स्थानकाजवळ खोळंबून आहेत. ठाणे ते तळोजा एक्सप्रेसने २५ मिनिटाचा प्रवास. परंतु या प्रवासाला आता १० तास उलटून गेले तरी प्रवासी अद्याप तळोजा रेल्वे स्थानकांच्या परिसरात एक्सप्रेसमध्ये खोळंबून आहेत. एक्सप्रेस सुरू होईल की नाही याची कोणतीही माहिती रेल्वेकडून दिली जात नाही. खोळंबुन राहिलेल्या तुतारी एक्सप्रेससह इतर एक्सप्रेसमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडली आहे. प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रवाशांच्या तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी एक्सप्रेसमधील रेल्वे तिकीट तपासनीस, इतर सेवक एक्सप्रेसमध्ये फिरकत नाहीत. खानपान सेवा ठप्प आहे. एक्सप्रेसमधून कुटुंबासह प्रवास करणाऱ्या गटातील लहान मुलांचे हाल सुरू आहेत, अशा तक्रार तुतारी एक्सप्रेसमधून रत्नागिरी येथे चाललेल्या डोंबिवलीतील केदार पाध्ये या प्रवाशाने केल्या. आणखी वाचा-दिव्यात कोकणातील प्रवाशांचा रेलरोको, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प तळोजा परिसरात दूर अंतरावर काही एक्सप्रेस पाठोपाठ उभ्या आहेत. पनवेल-कळंबोली रेल्वे मार्ग सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांनी सामान डोक्यावर घेऊन जवळचे रेल्वे स्थानक गाठून तेथून रस्ते मार्गाने इच्छित स्थळी जाण्याची तयारी सुरू केल्याचे दृश्य आहे. अत्याधुनिक यंत्रणा रेल्वेकडे असुनही शनिवारी दुपारी रुळावरुन घसरलेले मालगाडीचे डबे प्रशासन बाजुला का काढू शकले नाहीत, असे संतप्त प्रश्न खोळंबलेल्या प्रवाशांकडून केले जात आहेत. अनेक प्रवासी रेल्वेच्या सेवासंपर्क क्रमांकावर संपर्क साधून एक्सप्रेसमधील सुविधांच्या त्रृटीच्या तक्रारी करत आहेत. एक्सप्रेसमधील स्वच्छतागृहात पाणी नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. पनवेल, तळोजा, कळंबोली, पेण परिसरातील रेल्वे मार्गातून प्रवाशांचे जथ्थे पायी प्रवास करताना दिसत आहेत. कोकणात गणपतीसाठी गेलेले अनेक भाविक गर्दी कमी झाल्यानंतर ठाणे, मुंबईचा प्रवास सुरू करतात. हे सर्व प्रवासी शनिवारी दुपारपासून पनवेलजवळ एक्सप्रेसमध्ये अडकून पडले आहेत. निझामुद्दिन-एर्नाकुलम एक्सप्रेस टिटवाळा रेल्वे स्थानकात, एर्नाकुलम-ओखा एक्सप्रेस पेण रेल्वे स्थानकात थांबून ठेवण्यात आली आहे. सावंतवाडी-सीएसएमटी एक्सप्रेस पनवेल स्थानकात रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली.मालगाडीचे घसरलेले डबे बाजुला करुन पनवेल-कळंबोली रेल्वे मार्ग सुरळीत करण्याचे काम वेगाने सुरू आहे, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.