रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवासी संघटनांचे ठाण्यात धरणे
रेल्वे मार्गालगत संरक्षण भिंत आणि रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी पादचारी पूल नसल्याने रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजाने रेल्वे रूळ ओलांडावे लागत आहेत. या अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या प्रत्येक दिवशी नवा उच्चांक गाठत आहे. प्रवाशांच्या मृत्यूचा हा आकडा युद्धामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या सैनिकांप्रमाणेच दिवसेंदिवस वाढू लागला आहे. देशामध्येच प्रवास करताना रेल्वेच्या अपुऱ्या सेवेमुळे हे बळी पडत असून याला प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप करत ठाणे रेल्वे प्रवासी संघटनांच्या वतीने रेल्वे प्रशासनाचा गुरुवारी निषेध करण्यात आला. ठाणे प्रवासी संघाच्या वतीने आयोजित या निषेध आंदोलनास ठाणे परिसरातील दहाहून अधिक संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.
मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात बुधवारी सकाळी अवघ्या एका तासामध्ये झालेल्या अपघातात दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. एका पाच वर्षांच्या मुलीसह महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणीचा या अपघातात बळी गेला. अशाच एका अपघातात एका गॅंगमनलाही दोन्ही पाय गमवावे लागले. या अपघातांची गंभीर दखल घेऊन ठाणे रेल्वे प्रवाशांनी गुरुवारी सकाळी रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलन पुकारले होते. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या संख्येचा विचार केल्यास सर्वाधिक उत्पन्न रेल्वेला उपनगरीय रेल्वे स्थानकातून मिळत आहे. असे असताना या उत्पन्नाचा खर्च मात्र त्या प्रवाशांसाठी होतच नाही, असा आरोप यावेळी संघटनांनी केला. त्यामुळेच सगळ्या दुष्टचक्रामध्ये प्रवासी अडकून पडले आहेत. वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटनांनी हे सिद्ध झाले असून प्रवासी संघटनांकडून रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी प्रवासी संघटनांनी हे आंदोलन पुकारले आहे, अशी माहिती ठाणे रेल्वे प्रवासी संघाचे नंदकुमार देशमुख यांनी दिली.
या उपक्रमामध्ये ठाणे स्थानक परिसरातील दहा संघटनांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये ठाणे, दिवा, भांडूप-कांजूरमार्ग, वाशी-शिवडी, नवी मुंबई, कल्याण-कर्जत, मीरा-भाईंदर आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी सहभाग घेतला होता. नव्या वर्षांमध्ये प्रवाशांसाठी गाडय़ा वाढवण्यात आल्या नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

रेल्वे प्रवाशांच्या मागण्या
* गर्दीच्या वेळात रेल्वे गाडय़ांची संख्या वाढवावी.
* प्रत्येक स्थानकात रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात.
* बंबार्डियर लोकल मध्य रेल्वे मार्गावर चालू कराव्यात.
* पाचव्या-सहाव्या रेल्वे रुळाची कामे तत्काळ पूर्ण करावीत.
* रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पुलांची कामे पूर्ण करावीत.
* लांबपल्ल्याच्या गाडय़ांना ठाणे स्थानकात थांबा द्यावा.
* कल्याण-वाशी रेल्वे वाहतूक सुरू करावी.
* रेल्वे रुळांच्या बाजूने संरक्षण भिंतीची कामे पूर्ण करावीत.
* रेल्वे रुळांच्या बाजूने समांतर रस्ते उपलब्ध व्हावेत.

प्रवाशांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली रेल्वे अपुऱ्या फेऱ्यांमुळे आणि सुरक्षेच्या अपुऱ्या व्यवस्थांमुळे मृत्युवाहिनी बनली आहे. त्यामुळे जीवावर उदार होऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
– जगदीश धनगर, आंदोलक

रेल्वे अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांची परिस्थिती लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून कुचराई होत असते. अनेक वेळा अपघात घडल्यानंतर जखमींना तत्काळ सेवा मिळत नसल्याने प्राण गमवावे लागतात. ही असंवेदनशीलता थांबवण्याची गरज आहे.
– अभिजीत धुरत, आंदोलक