ठाणे : जिल्ह्यातील शिवसेनेचे नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन मिळत असतानाच, गुरुवारी ठाणे शहरातील रिक्षाचालकांनीही शिंदे यांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. या रॅलीत मोठ्या संख्येने रिक्षाचालक सहभागी झाल्याने शहरातील थांबे रिक्षाविना ओस पडल्याचे दिसून आले. थांब्यावर रिक्षाची वाट पहात प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागले असून त्याचबरोबर बराच काळ वाट पाहूनही रिक्षा येत नसल्यामुळे त्यांना अखेर टिएमटीच्या बसचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे बसमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. तर, याच संधीचा फायदा घेऊन काही रिक्षाचालक मात्र प्रवाशांकडून जास्त पैसे आकारत होते. शेअर रिक्षा उपलब्ध नसल्या तरी काही ठिकाणी मीटरप्रमाणे रिक्षा सुरु होत्या. त्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागले.

ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात शेअर आणि मीटर रिक्षांचे थांबे आहेत. शेअर रिक्षांचे प्रवास भाडे कमी असल्यामुळे अनेकजण त्यातून प्रवास करतात. या थांब्यांवर सकाळच्या वेळेत रिक्षाच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. रिक्षाचालक प्रवाशांची वाट पहात उभे असतात. गुरुवारी सकाळी मात्र नेमके उलटे चित्र दिसून आले. प्रवाशी रिक्षा चालकांची वाट पाहताना दिसून आले. ठाणे शहरात रिक्षाचालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. यामध्ये  वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, यशोधननगर, कामागार नाका, ज्ञानेश्वर नगर, नितीन कंपनी, किसन नगर, रोड क्रमांक १६ , इंदिरा नगर अशा विविध भागातील रिक्षाचालक मोठ्या संख्येने सामील झाले होते.  यामुळे शहरातील रिक्षा थांबे ओस पडल्याचे दिसून आले. ठाणे ते वागळे इस्टेट हे अंतर जास्त असून याठिकाणी मीटर रिक्षाने प्रवास करणे प्रवाशांना परवडत नाही. तसेच टिएमटीची बस वाहतूक या मार्गावर सुरु असली तरी प्रवाशांच्या तुलनेत ही सेवा कमी असून त्याचबरोबर बसगाड्या प्रवाशांना वेळेवर उपलब्ध होत नाहीत. मीटर रिक्षांच्या तुलनेत शेअर रिक्षांचे प्रवासी भाडे कमी आहे. त्यामुळे अनेकजण शेअर रिक्षानेच प्रवास करतात. यामध्ये नोकरदार वर्गाची संख्या मोठी आहे. सकाळच्यावेळेत थांब्यावरुन प्रवाशांना सहज रिक्षा मिळते. परंतू, गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत रिक्षाचालक मोठ्या संख्येने सामील झाले होते. त्यामुळे ऐन कामाला जाण्याच्या वेळी रिक्षा मिळणे प्रवाशांसाठी जिकरीचे झाले होते. पंधरा ते वीस मिनिटे प्रवाशांना रिक्षाची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागले. कामाला जाण्यास उशिर होऊ नये यासाठी अनेकांनी टीएमटी बस चा आधार घेतला होता. त्यामुळे टीएमटी बसमध्येही प्रवाशांची गर्दी वाढली होती. शेअर रिक्षाचालक प्रती प्रवासी २० रुपये भाडे आकारतात. परंतू, रॅलीमुळे थांब्यावर शेअर रिक्षाच उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे काही जणांनी ५० ते ६० रुपये देऊन मीटर रिक्षाने प्रवास केला.

मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ रॅली

ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यांवर रिक्षांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. रिक्षावर भगवे झेंडे लावण्यात आले होते तर, मी रिक्षावाला- मी मुख्यमंत्री अशा टिशर्ट चालकांनी परिधान केल्या होत्या. महिला रिक्षाचालकही मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या. या रिक्षाचालकांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. ‘रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती’ अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या टीकेला एकप्रकारे प्रत्युत्तर देण्याचा शिंदे समर्थकांचा हा प्रयत्न असल्याचे दिसून आले. माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी या रिक्षामधून नौपाडा परिसरात रॅली काढली. महापालिका मुख्यालयासमोर उभ्या केलेल्या रिक्षामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. काही वेळासाठी हा मार्गही बंद करण्यात आला होता. तसेच या रिक्षांच्या गर्दीमुळे मार्ग बंद झाल्याने एक रुग्णवाहीकेला पुढे जाणे शक्य होत नव्हते. दरम्यान, चालकांनी रिक्षा बाजुला करत रुग्णवाहीकेला वाट मोकळी करून दिली.