Pathan film board removed from Madhuban cinema in Dombivli ssb 93 | Loksatta

ठाणे : डोंबिवलीतील मधुबन सिनेमागृहावरील ‘पठाण’ चित्रपटाचा फलक हटविला; बजरंग दलाकडून शाहरूखसह दीपिकावर देशविरोधी भूमिकेचा आरोप

बुधवारी सकाळपासून ‘पठाण’ चित्रपट मधुबन सिनेमा गृहात प्रदर्शित करण्यात येत आहे. शहरात तीन ठिकाणी हा चित्रपट दाखविण्यात येत आहे.

Pathan film board removed Dombivli
डोंबिवलीतील मधुबन सिनेमागृहावरील ‘पठाण’ चित्रपटाचा फलक हटविला (image – लोकसत्ता टीम)

बजरंग दलाकडून अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री दीपिका पदुकोन यांच्यावर देशविरोधी भूमिकेचा आरोप करण्यात आला आहे. ‘पठाण’ चित्रपटाचा फलक मधुबन सिनेमागृहावरून हटविण्यात यावा यावरून बजरंग दलाच्या डोंबिवलीतील कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी चित्रपटगृह मालकाबरोबर चर्चा करून सिनेमागृहावरील ‘पठाण’ चित्रपटाचा फलक काढण्यात आला.

बुधवारी सकाळपासून ‘पठाण’ चित्रपट मधुबन सिनेमा गृहात प्रदर्शित करण्यात येत आहे. शहरात तीन ठिकाणी हा चित्रपट दाखविण्यात येत आहे. अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री दीपिका पदुकोन यांची भूमिका असलेला हा चित्रपट डोंबिवलीत दाखविला जात आहे हे समजल्यावर बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी बुधवारी संध्याकाळी चित्रपटगृहाबाहेर येऊन पठाण चित्रपटास विरोध केला. हा सिनेमा तात्काळ बंद करावा, सिनेमागृहावरील फलक काढून टाकावे, अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. सिनेमागृहात चित्रपट सुरू असताना बाहेर आंदोलन सुरू झाले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. अखेर सामंजस्याने चित्रपट गृहावरील पठाण चित्रपटाचा फलक हटविण्यात आला. त्यानंतर कार्यकर्ते निषेध नोंदवून तेथून निघून गेले.

हेही वाच – ठाण्यात भाजपने साजरा केला उत्तर प्रदेश स्थापना दिवस, शहरातील चार ठिकाणी पार पडला कार्यक्रम

हेही वाचा – ठाणे : भिवंडीत तीन वर्षांच्या मुलीची हत्या, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

बजरंग दलाचे डोंबिवली प्रमुख करण उल्लेंगल यांनी सांगितले, पठाण चित्रपटाला आमचा विरोध नाही. या चित्रपटात अभिनय करणारे शाहरूख खान, दीपिका हे कलाकार नेहमीच भारत विरोधी भूमिका घेतात. त्यांच्या या भूमिकांना आमचा विरोध आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही हे निषेध आंदोलन केले.
फोटो ओळ

डोंबिवलीत मधुबन सिनेमागृहावरुन पठाण चित्रपटाचा फलक हटविला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 22:08 IST
Next Story
ठाणे : भिवंडीत तीन वर्षांच्या मुलीची हत्या, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू