गौरीपूजनासाठी पत्रीबाजार फुलला!

गणपती आणि विशेषत: गौरीपूजनात या पत्रींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

यंदा किमती वाढल्या तरीही भाविकांकडून खरेदी; रानभाज्यांनाही चांगली मागणी

सागर नरेकर
बदलापूर : गेल्या वर्षी शहरी भागातील करोनाबाधितांच्या संख्येची धास्ती घेत अनेक आदिवासी महिलांनी गौरीपूजनात आवश्यक असलेल्या पत्री विक्रीकडे पाठ फिरवली होती. मात्र यंदा हळूहळू पूर्वपदावर आलेली सार्वजनिक वाहतूक सेवा व र्निबधांतील शिथिलता यांमुळे बदलापुरात भरणारा पत्री व औषधी वनस्पतींचा बाजार सजला आहे.

गणपती आणि विशेषत: गौरीपूजनात या पत्रींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा पत्रींच्या किमती वाढल्या असल्या तरी भक्त त्याची स्वच्छेने खरेदी करत आहेत, तर रानभाज्यांचा हंगाम संपत असला तरी त्याला चांगली मागणी आहे.

आगरी, कोळी आणि कोकणी संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेल्या गौरीपूजनाचा उत्साह बदलापूर, अंबरनाथ या शहरांमध्ये दरवर्षी पाहायला मिळतो. या उत्सवासाठी औषधी वनस्पती, फुले आणि पत्रींचे महत्त्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या औषधी वनस्पती, फुले आणि पत्रींची विक्री करण्यासाठी मुरबाड, अंबरनाथ तालुक्यातून मोठय़ा संख्येने आदिवासी महिला येत असतात. रानात, जंगलात फिरून आदिवासी ही फुले, पत्री गोळा करत असतात. यात तुळस, केवडा, दुर्वा, अगस्ती, कन्हेर, जाई, धापा, धुणा, रुई, िपपळ, माका, मालती, धोत्रा, डोरली, देवदार अशा औषधी वनस्पती आणि झाडांच्या पानांचा समावेश असतो. गौरी फुले, घुंगराची काठी नावाने प्रसिद्ध अशी अनोखी वनस्पतीही यानिमित्ताने बाजारात विक्रीसाठी येत असते.

गौरी आगमनाच्या आदल्या दिवशी किंवा गौरी आगमनाच्या दिवसापासून आदिवासी महिला यांच्या विक्रीसाठी बदलापूर, अंबरनाथमध्ये येत असतात. गेल्या वर्षांत करोनाच्या संकटात बदलापूर शहरातील रुग्णसंख्येच्या धास्तीने अनेक आदिवासींनी विक्रीसाठी शहरात येणे टाळले होते. मात्र यंदा रुग्णांची संख्या कमी असल्याने आणि वाहतुकीची अनेक साधनेही उपलब्ध झाल्याने मोठय़ा संख्येने आदिवासी महिला पत्रीविक्रीसाठी बदलापुरात आल्या. त्यामुळे रविवारी बदलापुरात पत्री बाजार फुलला होता.

रानभाज्या हंगामाचा शेवट

पहिल्या पावसानंतर सुरू झालेल्या रानभाज्यांचा हंगाम आता समाप्तीकडे चालला आहे. अनेक रानभाज्या सध्या बाजारातून गायब झाल्या आहेत. मात्र त्यानंतरही उपलब्ध रानभाज्यांना बाजारात चांगली पसंती मिळते आहे. अनेक ग्राहक गौरीपूजनात नैवेद्यासाठी या भाज्यांना पसंती देत आहेत.

दर वाढले, पण खरेदी कायम

गेल्या काही वर्षांत २० ते ३० रुपयांना मिळणाऱ्या औषधी वनस्पती आणि पत्रींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या ८० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत पत्रींची विक्री केली जात आहे. मात्र दर वाढले असले तरी ग्राहक त्याची विनातक्रार खरेदी करत आहेत. आदिवासी महिलांना चार पैसे मिळतील ही भावनाही या खरेदीमागे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Patri bazar flourishes gauri pujan ssh

ताज्या बातम्या