सॅटीस प्रकल्पातील डेक उभारणीचा मार्ग मोकळा

ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सॅटीस-२ प्रकल्प राबविण्यात येत आहे.

ठाणे पूर्व स्थानक परिसरातील ११ टपऱ्या बस थांबे हटविले

ठाणे : पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस -२ प्रकल्पाच्या कामातील महत्त्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या डेकचे काम येत्या काही दिवसांत सुरू केले जाणार असून या कामात अडसर ठरणाऱ्या ११ टपऱ्यांसह विविध परिवहन सेवांचे बसथांबे मंगळवारी महापालिका प्रशासनाने हटविण्याची कारवाई केली. यामुळे डेकच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सॅटीस-२ प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू होते. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नुकतीच बैठक घेऊन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी प्रकल्पाच्या कामात अडसर ठरत असलेल्या बांधकामातील नागरिकांचे पुनर्वसन करून हटविण्याचे आदेश दिले होते. या कामात अडथळे आणणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा असे आदेशही त्यांनी दिले होते. या आदेशानंतर नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांच्या पथकाने मंगळवारपासून स्थानक परिसरातील टपऱ्या हटविण्याची कारवाई सुरू केली. जेसीबीच्या साहाय्याने ११ टपऱ्या हटविण्यात आल्या असून आणखी तीन टपऱ्या हटविण्यात येणार आहेत.

लाभार्थीना दुसरीकडे जागा

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विविध योजनांतर्गत ठाणे पूर्व स्थानक भागात लाभार्थ्यांना टपऱ्या देण्यात आल्या होत्या. या टपऱ्या सॅटीस -२ प्रकल्पातील डेकच्या कामात अडसर ठरत होत्या. त्यामुळे या टपऱ्या हटविण्यात आल्या असून या लाभार्थ्यांना आता दुसऱ्या ठिकाणी जागा दिली जाणार आहे. त्यासाठी वाहतुकीस अडथळा ठरणार नाहीत, अशा जागा पालिकेच्या प्रभाग समितीमधील अभियंता सुचविणार आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pave deck erection satis project ysh

Next Story
कळवा तिसऱ्या खाडी पुलाची प्रतीक्षा
फोटो गॅलरी