एका धरणाचा मृत्यू : ‘धरण वाचवा’ मोहीम

संरक्षक तारेचे कुंपण घातले तरी धरण वाचू शकते, असे पर्यावरणवादी संघटनांनी म्हटले आहे.

पापडखिंड वाचवण्यासाठी वसईत विविध संघटनांचा पुढाकार

विरार शहरातील पापडखिंड धरण वाचवण्यासाठी वसईतून सामाजिक संघटनांनी मोहीम हाती घेतली असून प्रशासनाने प्रयत्न केल्यास धरण वाचवणे सहज शक्य आहे, असे या संघटनांच्या वतीने सांगण्यात आले. पापडखिंड धरणातील गाळ गेल्या ४५ वर्षांत एकदाही काढला गेलेला नाही. छटपूज करणाऱ्यांना अटकावही केलेला नाही. संरक्षक तारेचे कुंपण घातले तरी धरण वाचू शकते, असे पर्यावरणवादी संघटनांनी म्हटले आहे.

विरार शहरातील १९७२ सालापासून असलेल्या पापडखिंड धरणातील पाणीपुरवठा महापालिकेने थांबवला असून कायमस्वरूपी धरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे धरण वाचवण्यासाठी विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आहेत.

जनआंदोलन समितीने बैठक घेऊन करवाढीपेक्षा धरण वाचवण्याचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गुरुवारी समितीतर्फे धरणाची पाहणी केली जाणार असून धरण वाचवण्यासाठी आंदोलनाचा पुढील आराखडा तयार केला जाणार आहे. पाण्याचे धरण बंद करून त्या मनोरंजनासाठी पाण्याची नासाडी करणारी ही एकमेव महापालिका असल्याचा आरोप जनआंदोलनाच्या नेत्या डॉमनिका डाबरे यांनी केला आहे. शहरात टँकरने दूषित पाणीपुरवठा होत असताना शुद्ध पाण्याचे धरण महापालिका आणि सत्ताधारी बंदच कसे करू शकतात, असा सवाल त्यांनी केला.

वसई पर्यावरण संवर्धक समितीनेही कुठल्याही परिस्थितीत धरण वाचलेच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. एमएमआरडीए आराखडय़ाविरोधात वसई पर्यावरण समितीचे आंदोलन सुरू आहे. याचबरोबर पापडखिंड धरण वाचवण्याचे आंदोलन हाती घेण्यात आहे, असे समितीचे निमंत्रक समीर वर्तक यांनी सांगितले. धरण वाचवण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत, त्याचबरोबर कायदेशीर प्रक्रियेचाही अभ्यास सुरू करण्यात आला आहे, असे वर्तक यांनी सांगितले.

धरण वाचवणे सहज शक्य

पापडखिंड धरणातून विरार पूर्वेला दररोज १ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून धरणाच्या पाण्यात छटपूजा आयोजित करण्यात येत आहे. पालिकेने या भागात छटपूजेला बंदी घातली असली तरी ती डावलून हजारो नागरिक छटपूजेसाठी पाण्यात उतरतात आणि यामुळे धरणाचे पाणी दूषित झाले आहे. याशिवाय धरणाच्या काठावर दशक्रिया विधी करण्यात येत असल्याने पाणी दूषित होत असते. धरणाचा परिसर मोकळा असल्याने प्रवेश करण्याच्या अनेक जागा आहेत. त्यासाठी महापालिकेने संरक्षक भिंत बांधून सुरक्षारक्षक नेमले तरी लोकांचा अटकाव थांबू शकेल. महापालिकेने छटपूजेला बंदी घातली, तरी स्थानिक आमदार छटपूजेसाठी लोकांबरोबर उभे राहत होते. त्यांनी जर लोकांना मनाई केली, तर छटपूजा होणार नाही. पापडखिंड तलावातील गाळ आजवर एकदाही काढला गेला नाही. गाळ काढला तरी तलावाची साठवण क्षमता वाढेल. तारेचे कुंपण घालून धरणाला सुरक्षित करणे सोपे असल्याचे पर्यावरणवादी संघटनांकडून सांगण्यात आले.

लोकांची उदासीनता कारणीभूत

पापडखिंड धरण वाचवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला. छटपूजा करू नये, असे वारंवार लोकांना आवाहन केले. त्यांच्यासाठी अर्नाळा समुद्रकिनारी व्यवस्था केली होती. मोफत बस ठेवल्या होत्या, मात्र लोक जात नव्हते, असे आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले. धरणाच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेला दोषी धरणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. जे लोक या धरणाचे पाणी पीत होते, तेच हे धरण प्रदूषित करत होते, असे ते म्हणाले. सूर्याचे पाणी आल्याने आम्हाला पापडखिंड धरणाचे पाणी नको, असाही एक मतप्रवाह होता, असेही ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pawankhind dam issue virar city

ताज्या बातम्या