scorecardresearch

कल्याणमधील रस्त्यांसाठी ११० कोटी द्या ;पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार, आमदारांची मागणी

कल्याण : कल्याण पूर्व तसेच पश्चिम भागांतील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण होणे गरजेचे आहे. महत्त्वपूर्ण रस्त्यांची कामे रखडल्याने वाहनकोंडीचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे कल्याण पश्चिमेसाठी ६० कोटी तर पूर्व भागासाठी ५० कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या विकासासाठी उपलब्ध करून द्या अशी मागणी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे […]

(कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रस्तावित स्मारक)

कल्याण : कल्याण पूर्व तसेच पश्चिम भागांतील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण होणे गरजेचे आहे. महत्त्वपूर्ण रस्त्यांची कामे रखडल्याने वाहनकोंडीचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे कल्याण पश्चिमेसाठी ६० कोटी तर पूर्व भागासाठी ५० कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या विकासासाठी उपलब्ध करून द्या अशी मागणी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. दरम्यान, कल्याणमधील ज्या रस्त्यांसाठी निधी देण्याची गरज आहे, त्याचा प्राधान्याने विचार करू, मात्र केंद्र सरकारचेही निधीच्या माध्यमातून सहकार्य मिळवून द्या, असे आवाहन करत शिंदे यांनीही या मुद्दय़ावर दोन्ही बाजूंनी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
कल्याण पूर्वेतील आंबेडकर स्मारक भूमिपूजन सोहळय़ासाठी दोन्ही मंत्री मंगळवारी एका व्यासपीठावर आले होते. त्या वेळी आपल्या मतदारसंघात विकासकामांसाठी निधी कसा मिळेल यासाठी उपस्थित प्रत्येक खासदार, आमदाराने मंत्र्यांसमोर रस्ते कामाची गाऱ्हाणी मांडली. कल्याण पश्चिम भागातील अनेक महत्त्वाचे रस्ते स्मार्ट सिटी निधीतून पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर काही रस्ते पूर्ण होणे आवश्यक आहे. हे रस्ते स्मार्ट झाले तर नागरिकांची अडथळय़ांची शर्यत कायमची बंद होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
कल्याण पूर्व येथील मलंग रस्ता ते श्रीराम सिनेमा हा १०० फुटी रुंद रस्ता स्मार्ट होणे आवश्यक आहे. याशिवाय इतर अंतर्गत रस्ते
कामे झाली पाहिजेत यासाठी नगरविकास विभागाने ५० कोटींचा निधी मंजूर करावा, अशी मागणी कल्याण पूर्वचे आ. गणपत गायकवाड यांनी केली.
दरम्यान, शहरांचा शाश्वत विकास होण्यासाठी पक्षभेद विसरून नगरविकास विभाग निधी देतो. कल्याण पश्चिमेत पालिकेने न मागता विकासकामांसाठी यापूूर्वी ५० कोटी मंजूर केले आहेत.
दोन वर्षांत एक हजार कोटींचा निधी पालिकेला मिळाला आहे. विकासकामांसाठी हात आखडता घेतला जात नाही. नस्ती, टेबल हा प्रकार आणि ते खेळविणारा अधिकारी आपणास अजिबात आवडत नाही. त्यामुळे मंजूर निधी थेट पालिकेच्या तिजोरीत येतो, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.
स्मारकासाठी १० कोटी
कल्याण पूर्वेतील आंबेडकर स्मारकासाठी विस्तृत प्रकल्प आराखडय़ानुसार पाच कोटी मंजूर होते. शासनाने आणखी पाच कोटी मंजूर केले आहेत, अशी माहिती खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली. पूर्व भागात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी खासदारांनी केली. येत्या वर्षभरात स्मारकाचे काम पूर्ण होईल, असे खा. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. पुतळा उभारणीसाठी शासनाची कठोर नियमावली आहे. वर्षभरात या परवानग्या मिळतील का आणि स्मारकाचे पूर्ण होईल का, असे प्रश्न आंबेडकरप्रेमी नागरिक उपस्थित करत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pay rs 110 crore roads kalyan demand mp mla guardian minister eknath shishad amy