ठाणे / नवी मुंबई : पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा कलिंगडातील कथित विषबाधेमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर उन्हाळ्यातील आवडीचे फळ असलेल्या कलिंगडाबद्दल वेगाने अफवा पसरू लागल्या आहेत. या अफवांमुळे मंगळवारी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडाची विक्री निम्म्यावर आली आणि दरही गडगडले. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी मात्र, कलिंगड खाल्ल्याने शरीराला अपाय होण्याची शक्यता फेटाळली आहे.
पश्चिम आशियातील युद्धामुळे कलिंगडाची आखाती देशांकडे होणारी निर्यात बंद झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माल स्थानिक बाजारात येत आहे. एपीएमसी फळ बाजारात सध्या दररोज सुमारे ४ ते ५ हजार क्विंटल कलिंगडाची आवक होत आहे. मात्र त्यापैकी दररोज केवळ ७०-८० टक्के मालाचीच उचल होत असल्याने उर्वरित माल साठून राहत आहे. वाढलेली आवक आणि घटलेली मागणी यामुळे बाजारातील समतोल बिघडला आहे. असे असतानाच पायधुनी परिसरात शनिवारी रात्री बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने चार जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूंचे नेमके कारण समजले नसले तरी समाज माध्यमांवर कलिंगडामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित झाल्याने या फळाच्या विक्रीवर परिणाम झाला.
‘एपीएमसी’मध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ३,७३० क्विंटल कलिंगडापैकी केवळ ४० ते ५० टक्केच मालाची विक्री झाली. मागणी घटल्यामुळे महिन्याभरापूर्वी घाऊक बाजारात प्रतिकिलो २५ ते ३० रुपये दराने विकले जाणारे कलिंगड सध्या १० ते १५ रुपये किलोपर्यंत घसरले आहे. मागणी आणखी घटल्यास दर आणखी कोसळण्याची भीती व्यापार्यांकडून व्यक्त केली जात आहे.
किरकोळ विक्रेत्यांकडे पायधुनीतील घटनेबाबत ग्राहक विचारणा करतात आणि त्यानंतर कलिंगड खरेदी करायचे की नाही हे ठरवत आहेत. त्यामुळे हे विक्रेते देखील कलिंगड विक्री करण्यास धास्तावले आहेत – राहुल पाटील, कलिंगड व्यापारी (एपीएमसी)
‘विषबाधा अन्य कारणांमुळे’
मुंबई : पायधुनी प्रकरणात विषबाधा होण्यामागे विविध कारणे असल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे अन्न खराब होण्याची शक्यता अधिक असून फळे पिकविण्यासाठी वापरल्या जाणार्या रसायनाच्या अधिक मात्रतेमुळे विषबाधा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पायाधुनीमध्ये घडलेल्या या घटनेमध्ये संपूर्ण कुटुंबाला कोणी तरी जेवणामधून किंवा फळांमधून विष दिल्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे, अशा वेळी अन्न खराब होऊन त्यामध्ये विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. या कुटुंबातील सदस्यांनी खाल्लेली बिर्याणी किंवा कलिंगड खराब झालेले असण्याची शक्यता आहे. फळे पिकविण्यासाठी किंवा रंग अधिक गडद करण्यासाठी विक्रेते मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर करतात. यामध्ये फॉर्मेलिन, कार्बाइड, ऑक्सीटोसिन यांसारख्या रसायनांचा वापर करण्यात येतो. तसेच अनेकदा मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचाही वापर करण्यात येतो. या रसायनामुळे मळमळ, उलट्या, जुलाब आणि निर्जलीकरण होऊन मृत्यू झाला असण्याची शक्यता कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी व्यक्त केली.
बिर्यानी नऊ जणांनी खाल्ली, त्यापैकी फक्त चार जणांनी कलिंगड खाल्ल्यावर त्यांना त्रास झाला. यामुळे बिर्यानीमध्ये काही नाही हे निश्चित होते. कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे कलिंगडापूर्वी त्यांनी दुसरे काही तरी खाल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा परिणाम कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळाने झाल्याची शक्यता आहे. मात्र विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे तपासण्यांमधूनच स्पष्ट होऊ शकते. – डॉ. मोहन जोशी, वरिष्ठ जठरांत्र शल्यचिकित्सक
विषबाधा झालेले कुटुंब आमच्याकडे आले, तेव्हा त्यांनी कलिंगड खाल्ले होते, असे सांगण्यात आले. पण कलिंगडमुळेच विषबाधा झाली असे आपण सध्या तरी म्हणू शकत नाही. कलिंगड खाण्यापूर्वी त्यांच्या पोटामध्ये नेमका कोणता घटक गेला? त्याचा परिणाम झाला का? हे अहवालानंतरच कळू शकेल. – डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधीक्षक, जे. जे. रुग्णालय
