ठाणे : पश्चिम रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसरातील पदपथांवर सायंकाळपासून फेरीवाल्यांचा बाजार भरण्यास सुरुवात होत असून रात्री उशिरापर्यंत हा बाजार सुरूच असतो. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे पदपथावरून चालणे शक्य होत नाही आणि रस्त्यावर रिक्षांची सतत वर्दळ सुरू असल्याने अपघाताची भीती असते. यामुळे स्थानकातून प्रवास करणारे नागरिक हैराण झाले आहेत.
ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. करोनाकाळात ठाणे स्थानक परिसर फेरीवालामुक्त झाला होता; परंतु करोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर रेल्वेमधून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सर्व कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. यामुळे स्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. स्थानकाबाहेरील सॅटीस पुलाखाली सकाळच्या वेळेत फेरीवाले फारसे दिसून येत नाहीत. मात्र, सायंकाळ होताच या ठिकाणी फेरीवाल्यांचा बाजार भरण्यास सुरुवात होते. हा बाजार सायंकाळच्या वेळेत कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. स्थानकाबाहेरील सॅटीस पुलाखाली असलेल्या पोलीस चौकीपासून ते अलोक हॉटेलपर्यंतचे पदपथ फेरीवाले अडवितात. यामुळे प्रवाशांना पदपथावरून चालणे शक्य होत नाही. बाजूच्या रस्त्यांवर रिक्षांची वर्दळ असल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरूनही चालणे शक्य होत नाही.
रिक्षाचा धक्का लागून अपघात होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. तसेच अलोक हॉटेलपासून ते गावदेवी आणि स्थानक परिसरातील आंबेडकर पुतळा परिसरातही फेरीवाले पदपथ आणि रस्ते अडवीत असल्याचे दिसून येते. सायंकाळी सुरू होणारा हा बाजार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या अतिक्रमणामुळे प्रवाशी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.
दादागिरी कायम
ठाणे स्थानकातील पदपथांवर फेरीवाले ठाण मांडून बसत असल्यामुळे नागरिकांना तेथून चालणे शक्य होत नाही. यातूनच काही नागरिक फेरीवाल्यांना ठेला बाजूला घेऊन वाट मोकळी करून देण्यास सांगतात. मात्र, फेरीवाले उलट त्यांच्यावरच दादागिरी करताना दिसून येतात. मध्यंतरी फेरीवाल्यांनी अशीच अरेरावी केल्यानंतर भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी फेरीवाल्याच्या कानशिलात लगावली होती.
कारवाई थंड
करोना काळाआधीही ठाणे स्थानक परिसरात सायंकाळपासून फेरीवाल्यांचा बाजार भरण्यास सुरुवात व्हायची. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेची पथके नेमण्यात आली होती; परंतु आता ही कारवाई थंडावल्याने फेरीवाल्यांचा पुन्हा बाजार भरू लागल्याचे दिसून येते. घोडबंदर भागात गेल्या वर्षी महापालिकेच्या महिला सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकूहल्ला केला होता. त्यानंतर पालिकेने फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. ही कारवाईही आता थंडावल्याने फेरीवाले पुन्हा बस्तान मांडत दादागिरी करू लागल्याचे चित्र आहे.
पूर्वीपासूनच ठाणे स्थानक परिसरात सातत्याने कारवाई करण्यात येत असून रात्रीच्या वेळेतही कारवाईसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. – जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त अतिक्रमण विभाग, ठाणे महापालिका

Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
accident in Uran, Two died accident uran
उरणमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल
mumbai, shiv bridge, demolition work of shiv bridge
धूलीवंदनानंतर शीव उड्डाणपुलाचे पाडकाम सुरू होणार