कारवाईनंतरही ठाण्यातील रस्त्यांवर बस्तान; सकाळी, सायंकाळी उशिरा व्यवसाय

किशोर कोकणे
ठाणे : ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर महापालिकेने रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असली तरी महापालिकेच्या पथकाची पाठ फिरताच पुन्हा फेरीवाल्यांचे जथ्थे आपले बस्तान बसवू लागले आहेत. शहरातील वागळे इस्टेट, नितीन कंपनी भागांत बेकायदा फेरीवाल्यांचे ठेले दिसू लागले आहेत. सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ६ नंतर शहरातील पदपथ, रस्त्यांच्या कडेला फेरीवाल्यांचा सुळसुळाट होत आहे. काही राजकीय पक्ष कार्यालयांसमोर तसेच २०० मीटरच्या आवारात हे फेरीवाले बसत आहेत.

घोडबंदर येथील कासारवडवली भागात फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता िपपळे यांच्यावर अमरजीत यादव या भाजी विक्रेत्याने सुऱ्याने हल्ला केला. या हल्ल्यानंतर जागे झालेल्या ठाणे महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी आराखडा तयार करत पथके स्थापन केली. दिवस- रात्र फेरीवाल्यांविरोधात कारवाई होईल, असे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र, हल्ल्याला १० दिवस उलटत नाही तोच शहरात फेरीवाले पुन्हा बस्तान बसवू लागले आहेत. ठाणे शहरातील जांभळीनाका बाजारपेठ, घोडबंदर येथील यशस्वी नगर, मनोरमानगर, मानपाडा, ढोकाळी, वागळे इस्टेट येथील इंदिरा नगर, नितीन कंपनी, ज्ञानेश्वर नगर या भागांत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. यातील अनेक फेरीवाले हे राजकीय पक्षांची कार्यालये, नगरसेवकांच्या कार्यालयांसमोर किंवा १०० ते २०० मीटर अंतराच्या आवारातच आहेत. त्यामुळे महापालिकेत फेरीवाल्यांविरोधी भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेविषयी सर्वसामान्य ठाणेकरांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत हे फेरीवाले व्यवसाय करतात. सकाळी ११ नंतर महापालिकेची पथके येण्यास सुरुवात झाल्यानंतर फेरीवाले काही काळ गायब होतात. त्यानंतर पुन्हा बस्तान मांडत आहेत, तर सायंकाळी ६ नंतर पुरेशी पथके फिरत नसल्याने फेरीवाले बिनदिक्कत पदपथ आणि रस्ते अडवू लागले आहेत.

महापालिकेची कारवाई सुरूच

ठाणे : महापालिकेकडून शहरातील काही भागांत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. सोमवारी पालिकेच्या पथकाने नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातील अलोक हॉटेल, गावदेवी, तीन हात नाका, राममारुती रोड, तलावपाळी दुकानांसमोरील साहित्य जप्त केले, तसेच स्थानक परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका व कोर्ट नाका येथील २० फळांच्या पाटय़ा जप्त केल्या, तर दौलत नगर ते भाजी मार्केट, सिद्धार्थ नगर, स्थानक रस्ता आणि मंगला स्कूल या परिसरातील फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. दिवा स्थानक रस्ता, दिवा आगासन रस्ता, दातिवली रस्ता आणि मुंब्रादेवी कॉलनी रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच पदपथावरील अतिक्रमण हटविण्यात आले.

फेरीवाल्यांविरोधात महापालिकेची कारवाई सुरू आहे. येत्या काही दिवसांत या फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी आणखी काही पथके स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

– अश्विनी वाघमळे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, ठाणे महापालिका.