डोंबिवली – येथील पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर दोन फेरीवाल्यांनी एका पादचाऱ्याला लाथाबुक्की, बांबूने काल रात्री बेदम मारहाण केली. पूर्व भागातील फेरीवाले रस्ते, पदपथांवरून हटत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. जितलाल रामआश्रय वर्मा (२३), श्रीपाल रामआश्रय वर्मा (२५) अशी आरोपी फेरीवाल्यांची नावे आहेत. ते दोघे भाऊ आहेत. नेहरू मैदान परिसरात राहणारे रहिवासी नरेश चव्हाण यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार नरेश चव्हाण काल रात्री डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून चालले होते. त्यावेळी रस्त्याला खेटून फेरीवाल्यांनी आपले सामान लावले होते. या सामानामुळे रस्त्यावरून चालता येत नसल्याने नरेश यांनी आरोपी जितलाल, श्रीपाल यांना रस्त्यावरचे सामान थोडे बाजूला घ्या म्हणून सांगितले. तुम्ही अशी सूचना करणारे कोण, रस्ता तुमचा आहे का, असे प्रश्न करून फेरीवाल्यांनी नरेश यांना पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. निवाऱ्याचा बांबू काढून त्यांच्या सर्वांगावर फटके मारले.
फेरीवाल्यांची ही मग्रुरी पाहून पादचारी हैराण झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. उपनिरीक्षक नीलेश वाडकर तपास करत आहेत.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.