दिवाळीपासून संख्येत दुपटीने वाढ; स्थानक परिसरात वाहतूक कोंडीमुळे पादचारी, वाहनचालक हैराण

डोंबिवली : महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली स्थानकाजवळील प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून हे सर्व रस्ते वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहेत. दिवाळीपासून फेरीवाल्यांच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली असून पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले असून दररोजच्या कोंडीमुळे वाहनचालकही हैराण झाले आहेत.

डोंबिवली आणि फेरीवाले हे समीकरण जुनेच असले तरी दिवाळीपासून फेरीवाल्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. फेरीवाले मुख्य रस्त्यांवरील जागा अडवून व्यवसाय करतात. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या डॉ. रॉथ रस्त्यावरून अनके नोकरदार खासगी वाहने घेऊन येतात. मात्र फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे याठिकाणी वाहन बाजूला घेण्यासाठी जागा उरत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजुचे पदपथ फेरीवाल्यांनी अडविल्याने पादचाऱ्यांना चालणे शक्य होत नाही. राजाजी रस्ता, टंडन रोड, फडके रोड भागातील रहिवासी दुचाकी, रिक्षा, खासगी वाहने डॉ. रॉथ रस्त्याने डोंबिवली पश्चिमेत जातात. त्यांना फेरीवाल्यांच्या उपद्रवामुळे वाहने नेताना कसरत करावी लागते. रेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना फेरीवाल्यांचा त्रास सहन करत रिक्षा वाहनतळावर जावे लागते.

सहा महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानक भागात सकाळी सात ते रात्रो १० फेरीवाला हटाव पथकाचे कर्मचारी नेमून परिसर फेरीवालामुक्त करण्यात आला होता. मात्र दोन महिन्यांपासून फेरीवाल्यांनी पुन्हा फडके रोड, नेहरू रस्ता, राजाजी रस्ता, रामनगर, बाजीप्रभू चौक येथे बस्तान मांडल्याने पादचारी नाराजी व्यक्त करत आहेत.

 फेरीवाल्यांमुळे या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. फेरीवाला हटाव पथकाचे फ आणि ग प्रभागातील एकूण ३० हून अधिक कर्मचारी फक्त कारवाईचा देखावा करण्यासाठी बाजारात फिरतात. फेरीवाल्यांवर कारवाई करत नाहीत, अशा तक्रारी कैलास गायतोंडे, कल्पना भार्गव या पादचाऱ्यांनी केल्या.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आठ महिन्यांपूर्वी फेरीवाला हटवा पथकातील २५० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रभागांत बदल्या केल्या होत्या. हे सर्व कर्मचारी पुन्हा आपल्या मूळ प्रभागात हजर झाले आहेत. नेहरू रस्त्यावर दररोज संध्याकाळी चार ते रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरी, भेळ विक्रेते व्यवसाय करतात. १० फुटी नेहरू रस्त्याचा अर्धा भाग फेरीवाल्यांच्या गाड्या अडवतात. यामुळे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणारे डोंबिवलीकर मेटाकुटीस आले आहेत.

रस्त्यांवर फेरीवाले बसू नये म्हणून मी सकाळ, संध्याकाळ कारवाई पथकाबरोबर असते. रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवर एकही फेरीवाला दिसणार नाही, असे आदेश दिले आहेत. कारवाई करून कामगार अन्य भागांत गेले की पुन्हा फेरीवाले तेवढ्या वेळेत येतात.   – रत्नप्रभा कांबळे, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली

फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे, तरी वर्दळीच्या नेहरू, फडके रस्त्यांवर, बाजीप्रभू चौकात फेरीवाले, भेळ विक्रेते बसत असतील तर त्यांच्यावर आक्रमकपणे कारवाई करणार आहोत. – भरत पाटील, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली