भाजपच्या सभांना आमिषे दाखवुन लोक आणली जातात. बचत गटांना निधी देऊन महिलांना खूश केले जाते, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी कल्याण येथील जाहीर सभेत बोलताना केला. वातावरण भाजपच्या विरोधात असले तरी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष करुन लोकांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य द्यावे आणि आपली लढाई जिंकण्यासाठी आहे, याचे भान ठेवावे, असा सल्लाही त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना यावेळी दिला.
कल्याण येथील खडकपाडा भागातील स्प्रिंग टाईम सभागृहात आमदार रोहित पवार यांची शुक्रवारी सभा झाली. राष्ट्रवादीचे प्रदेश नेते महेश तपासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस फोडली म्हणजे आपण सात ते आठ टक्के मतदान मिळवून लोकसभेत पुढे जाऊ असा विचार करुन भाजपने राष्ट्रवादी फोडली. हा प्रकार करुन त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना डिवचले आहे. या प्रकाराने राज्यात भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. आता भाजपला लोकसभेसाठी लक्ष्याचा आकडा गाठणे मुश्किल होणार आहे, असा दावा आमदार पवार यांनी यावेळी केला.




हेही वाचा >>> कल्याणमध्ये रेल्वे तंत्रज्ञाचा घरात संशयास्पद मृत्यू
भाजपच्या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी शरद पवार, उध्दव ठाकरे, काँग्रेसचे नेते राज्यभर दौरे करत आहेत. कार्यकर्त्यांनी आता पक्षाला ताकद देणे गरजेचे आहे. शहरांमध्ये लोकांच्या अनेक नागरी समस्या आहेत. ती कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला वेळ नाही. ही कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्या. ही कामे करताना समोरच्या मंडळींकडून विविध प्रकारचा त्रास दिला जाईल. कल्याण, डोंबिवलीत ते प्रकार खूप सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यावर मात करुन आपण निष्ठावान असल्याने, आपले हात काळे नसल्याने शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायचे आहेत, असेही ते म्हणाले. जे स्वार्थी होते ते आपले धंदे जपण्यासाठी सत्तेबरोबर गेले. आपण निष्ठावान आहोत याचे भान ठेवा. येत्या काळात नवतरुण मंडळींना चांगल्या संधी आहेत. या संधीचा उपयोग करुन भाजपला आपणास धडा शिकवायचा आहे. सर्वेक्षणात भाजप विरोधात राज्यात वातावरण आहे. लोकसभा, मुंबई पालिकेची निवडणूक जिंकून सत्ते कसे यायचे हेच भाजपचे लक्ष्य आहे. परंतु महाविकास आघाडी लोकांच्या प्रश्नांचा विचार करीत आहे. लोकांच्या मनात महाविकास आघाडीतील पक्षांना स्थान आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा >>> भाजपने देशाची जाहीर माफी मागावी; डॅा जितेंद्र आव्हाड
करोना तसेच मणिपूरमधील घटनांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन केंद्र सरकारने घेतले नाही. महिला कुस्तीपट्टुंचे दिल्लीतील आंदोलन, मणिपूरमधील महिलेची विटंबना यामुळे भाजपची नालस्ती झाली. हे वातावरण निवळण्यासाठी महिलांना ३३ टक्के आरक्षणाल देण्याचा निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन घेतले गेले. प्रतिमा संवर्धनाचा भाजपचा हा डाव लोकांनी ओळखला आहे. या सभेसाठी आमदार पवार यांनी मुंबई ते कल्याण असा लोकलने प्रवास केला. कल्याण, डोंबिवलीत नागरी विकासाचे अनेक प्रश्न आहेत अशा तक्रारी प्रवाशांनी रेल्वे प्रवासात त्यांच्याकडे केल्या.