ठाणे : मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी लोकलच्या दरात उभे राहून प्रवास करणारे १३ प्रवासी खाली पडले. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले. जखमींवर खासगी आणि सरकारी रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ठाणे रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली आहे.

प्रचंड गर्दीमुळे मुंबईकर नेहमीच जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. काही वेळा चेंगराचेंगरीत, तर काही वेळा घाईघाईत रेल्वेमार्ग ओलांडताना त्यांचा जीव जातो. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास जलद मार्गावर विचित्र अपघातात आणखी चार जणांचा बळी गेला. कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) निघालेल्या लोकलमध्ये ही दुर्घटना घडली. गाडीमध्ये नेहमीप्रमाणे उभे राहण्यासही जागा शिल्लक नसल्याने अनेक प्रवासी डब्याच्या दरवाजामध्ये लटकून प्रवास करत होते. लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आली असताना बाजूच्या रुळावरून कर्जत लोकल जात होती. तीव्र वळण आणि मार्गांमध्ये कमी अंतर असल्यामुळे दोन्ही लोकलच्या दरवाजांत उभे असलेले प्रवासी तसेच त्यांच्या बॅगा एकमेकींवर आदळल्याने दोन्ही गाड्यांमधील १३ प्रवासी खाली पडल्याची प्रथमदर्शनी माहिती असल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे.

खाली पडलेल्या प्रवाशांना ठाणे रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने इतर प्रवाशांच्या मदतीने ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वी विकी मुख्यदल (३४) या पोलीस शिपायासह केतन सरोज (२३), राहुल गुप्ता व मयूर शाह यांचा मृत्यू झाला होता. शिवा गवळी (२३), आदेश भोईर (२६), रेहान शेख (२६), अनिल मोरे (४०), तुषार भगत (२२), मनीष सरोज (२६), मच्छिंद्र गोदारणे (३९), स्नेहा धोंडे (२१), प्रियंका भाटिया (२६) हे प्रवासी जखमी झाले. यातील शिवा आणि अनिल मोरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित सात जणांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काही प्रवाशांच्या हाता-पायाचे अस्थिभंग झाले आहेत, तर काही जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

या अपघातानंतरची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. त्यात जखमी प्रवासी रेल्वे रुळांलगत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून येत होते. रेल्वे रुळांलगत पडलेल्या या प्रवाशांच्या बाजूने एक एक्स्प्रेस रेल्वेगाडी देखील जात असल्याचे चित्रीकरणात दिसत होते. रेल्वे रूळ आणि फलाटावर रक्ताचे सडे पडल्याचे दिसले. अपघातानंतर दोन बाजूकडील रेल्वे रुळांमधील अंतर तपासण्याचे काम रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून सुरू होते.

सर्व लोकलना स्वयंचलित दरवाजे?

नवी दिल्ली : मुंबईतील लोकलचे सर्व दरवाजे लवकरच स्वयंचलित केले जातील, अशी घोषणा रेल्वे मंडळाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सोमवारी केली. नव्याने दाखल होणाऱ्या लोकल गाड्यांबरोबरच सध्या धावत असलेल्या गाड्यांचे दरवाजांनाही आपोआप उघडबंद होण्याची यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रवाशांच्या सुरक्षेला रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचा दावाही कुमार यांनी केला.

अपघाताची संभाव्य कारणे

– मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ जलद मार्गिकेवर तीव्र वळण आहे. उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वळणावर तोल जाऊन प्रवाशांचा भार दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करणाऱ्यांवर येतो. या भारामुळे प्रवासी खाली पडले असण्याची शक्यता आहे. तीव्र वळणावर हा नेहमी अनुभव येत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

– मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ जलद मार्गिकेवर तीव्र वळण आहे. उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वळणावर तोल जाऊन प्रवाशांचा भार दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करणाऱ्यांवर येतो. या भारामुळे प्रवासी खाली पडले असण्याची शक्यता आहे. तीव्र वळणावर हा नेहमी अनुभव येत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वेमंत्र्यांची असंवेदनशीलता?

नवी दिल्ली : मुंब्रा येथील अपघाताबाबत रेल्वे मंत्रालयाने सोमवारी निवेदन प्रसिद्ध केले असतानाच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीरपणे प्रतिक्रिया देणेही टाळले. ‘मोदी ३.०’ सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या मुख्यालयात सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शेजारीच वैष्णवही होते. पत्रकार परिषद झाल्यानंतर ‘लोकसत्ता’च्या दिल्लीतील विशेष प्रतिनिधीने वैष्णव यांना लोकलच्या अपघातावर प्रतिक्रिया देण्याची विनंती केली. मात्र, रेल्वे मंत्रालयाने पत्रक काढले आहे, त्यामुळे या मुद्द्यावर अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही, असे सांगून रेल्वेमंत्री निघून गेले. यामुळे घटनेबाबत त्यांची असंवेदनशीलताच अधोरेखित झाल्याची चर्चा राजधानीत रंगली.