महाविद्यालयांना घुसखोरांचा ताप

ठाणे शहरातील प्रसिद्ध अशा महाविद्यालयांना गेल्या काही महिन्यांपासून घुसखोरांचा जाच होऊ लागला असून या महाविद्यालयांना लागूनच असलेल्या बेकायदा वस्त्यांमधील तरुणांची टोळकी विद्यार्थिनींची छेड काढत असल्याने येथील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे…

ठाणे शहरातील प्रसिद्ध अशा महाविद्यालयांना गेल्या काही महिन्यांपासून घुसखोरांचा जाच होऊ लागला असून या महाविद्यालयांना लागूनच असलेल्या बेकायदा वस्त्यांमधील तरुणांची टोळकी विद्यार्थिनींची छेड काढत असल्याने येथील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. यासंबंधी थेट पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल होत नसल्या तरी महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांकडे अशा तक्रारी येत असल्याची माहिती काही प्राध्यापकांनी तसेच विद्यार्थिनींनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.
ठाणे शहरातील बहुतांश महाविद्यालयांलगत बेकायदा वस्त्या उभ्या राहिल्या आहेत. या वस्त्यांमधील तरुण टोळकी सर्रास महाविद्यालयांत शिरून अथवा आवाराबाहेर ठाण मांडून उभी राहत असल्याचे समोर आले आहे. या तरुणांना हटकणाऱ्या महाविद्यालयांच्या सुरक्षारक्षकांनाही दमदाटी केली जात आहे. या टोळक्यांचा उपद्रव महाविद्यालयातील विद्यार्थिनींना होत असून अश्लील शेरेबाजी, छेड काढणे, पिच्छा पुरवणे, असे प्रकार केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे यासंबंधी तक्रारी केल्या, तर अनेक वेळा केवळ समज देऊन या मवाल्यांना बाहेर धाडले जात असल्याने या प्रवृत्तीला वचक बसत नसल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे.
दरम्यान, या स्वरूपाच्या तक्रारी अद्याप पोलिसांकडे आलेल्या नाहीत. मात्र, यासंबंधी महाविद्यालयांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, असे ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितले.

घटना घडण्यापूर्वी खबरदारी
ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या परिसरात महामार्ग आणि सेवा रस्ते असून या भागातून मुलींना जाताना मोटरसायकलस्वारांचा त्रास होत होता. या प्रकाराची थेट तक्रार आमच्याकडे येत नसली तरी मुलींच्या बोलण्यामधून हे धोके जाणवत होते. त्यामुळे अप्रिय घटना घडण्याअगोदरच खबरदारीचा उपाय म्हणून महाविद्यालयाच्या आवारात पोलीस चौकी उभारण्यात आली आहे.
सी. डी. मराठे, प्राचार्य, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे

सुरक्षेसाठी विशेष काळजी
कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली असून महाविद्यालयाचा परिसर सीसीटीव्हीच्या नियंत्रण कक्षेत येत असून सुरक्षारक्षकांची संख्याही येथे बरीच मोठी आहे. घुसखोरीची मुख्य समस्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान उद्भवते. यंदा प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असल्याने गर्दी होणार नाही. त्यामुळे अशी घुसखोरी टळू शकेल.
डॉ. नरेश चंद्र, प्राचार्य, बिर्ला महाविद्यालय, कल्याण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: People living surrounding college troubles female students

ताज्या बातम्या