वसाहतीचे ठाणे : मध्यवर्ती ठाण्यातला बहुभाषी एकोपा

परस्पर सामंजस्य आणि सूत्रबद्ध नियोजनाने या सोसायटीने अनेक चांगल्या योजना कार्यान्वित केल्या आहेत..

परेरानगर, खोपट, ठाणे (प)
एकेकाळी मुख्य शहराबाहेर असणारा खोपट परिसर आता मध्यवर्ती ठिकाणी आहे. साधारण तीन दशकांपूर्वी या परिसराचा पुनर्विकास होऊ लागला. बैठय़ा चाळींच्या जागी बहुमजली इमारती उभारल्या जाऊ लागल्या. नुकताच रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केलेले परेरानगर संकुल त्यापैकीच एक. परस्पर सामंजस्य आणि सूत्रबद्ध नियोजनाने या सोसायटीने अनेक चांगल्या योजना कार्यान्वित केल्या आहेत..

ठाण्यातील खोपट परिसरात पूर्वी बैठी वस्ती होती. रस्ते अगदीच अरुंद होते. स्थानकापर्यंत जाण्यास पुरेशी वाहन व्यवस्था नव्हती, हे कुणाला आता सांगितले तर खरेही वाटणार नाही. कारण रेल्वे स्थानकापासून अवघ्या किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर आता शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जातो. मात्र काही विकासकांनी २५ वर्षांपूर्वी दूरदृष्टी दाखवीत या परिसराचा पुनर्विकास सुरू केला. परेरा नगर वसाहत उभी राहण्याआधी या परिसरात बैठी घरे आणि एक लहान तळे होते. तळे बुजवून येथे परेरा नगर हे भव्य गृह संकुल उभारण्यात आले. १९९२ मध्ये या संकुलाची रीतसर नोंदणी केली व संकुलाची पहिली सर्वसाधारण सभा झाली. या संकुलात ४,५,६ असे तीन विभाग असून प्रत्येकी दोन विंग आहेत. तीन मजली इमारती असल्याने येथे लिफ्टची सोय नाही. येथे विविध भाषक एकूण ८८ कुटुंबांचे वास्तव आहे. सुरुवातीला संकुलात पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे सभासदांची गैरसोय होत असे. संकुलातील सदस्य अशोक राऊळ यांच्या मदतीने पाणीपुरवठय़ाची परिस्थिती सुधारली. २००३ मध्ये संकुलातील इमारतींचे प्लास्टर, रंगकाम व इतर दुरुस्ती ही कामे करण्यात आली. इमारतींच्या गच्चीवर पत्र्याची शेड टाकल्याने भिंतीतून आणि टेरेसमधून होणाऱ्या गळतीचे प्रमाण कमी झाले. संकुलात पाण्याच्या तीन टाक्या असून वेळोवेळी त्यांची दुरुस्ती केली जाते. संकुलात पर्जन्य जलसंधारण प्रकल्प राबविण्यात आला असल्याची माहिती जनार्दन हजारे यांनी दिली.
संकुलास तीन प्रवेशद्वार आहेत. त्यातील एक प्रवेशद्वार सुरक्षेसाठी बंद करण्यात आले आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या बाजूस औदुंबराच्या झाडाखाली वसलेले गणेश-दत्त मंदिर दृष्टीस पडते. २००० मध्ये स्थापन केलेल्या या मंदिराने संकुलात प्रसन्न वातावरणाचा अनुभव येतो. मंदिराचे व्यवस्थापन पाहण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. दरवर्षी सर्व सदस्य मंदिराचा वर्धापन दिन मोठय़ा उत्साहात साजरा करतात. मंदिरालगत चार बाकडे लावल्याने तिथे वयोवृद्धांचा हक्काचा कट्टा झाला आहे. मुलांना खेळण्यासाठी बाग आहे. संकुलाच्या भोवताली नारळ, गुलमोहर, अशोक, फणस, जांभूळ, लिंब, पिंपळ, उंबर अशी अनेक झाडे लावली आहेत. बागेसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी बोअरवेल आहे. बाग आणि वृक्षांची काळजी घेण्यासाठी माळी ठेवण्यात आला आहे. मंदिरापासून थोडे पुढे गेल्यानंतर वसाहत समितीचे कार्यालय आहे. मुलांना कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट या खेळांसाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. पार्किंगसाठी पुरेशी मोकळी जागा असून बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. संकुलात सुरक्षेसाठी चार सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. संकुलातील समस्या व नवीन सूचना मांडण्यासाठी मासिक सभा होत असते. सदस्यांच्या प्रश्नांचे निराकारण करण्यासाठी संकुलाच्या कमिटीतील सभासद आपल्या परीने काम करत असतात. संकुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट दर पाच वर्षांनी करण्यात येते.

सांस्कृतिक उपक्रम

या वर्षी १० जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान संकुलाचा रौप्यमहोत्सव साजरा केला. महोत्सवाची सुरुवात संकुलातील जीने स्वच्छ करणे, संकुलाच्या आवारातील भिंतीवर चित्रे काढणे यापासून झाली. आनंदमेळा, विविध खेळ, नृत्य, नाटक, शुद्ध संगीत अशा कार्यक्रमांची रेलचेल यात होती. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वानी यात हिरिरीने सहभाग घेतला होता. रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेत सदस्यांनी कविता आणि लेख लिहिले. संकुलात राष्ट्रीय सण, होळी, गोपाळकाला असे विविध सण साजरे केले जातात. २६ जानेवारीला वार्षिक स्नेहसंमेलन होते. पाच दिवस खेळ आणि तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम असे आठ दिवस कार्यक्रम चालतात. या कार्यक्रमांची तयारी दोन महिन्यांपासून केली जाते.
मुलांवर सामाजिक संस्कार व्हावेत, या हेतूने खास उपक्रम राबविले जातात. संकुलातील सदस्य विश्वास गोरे यांच्या बदलापूर येथील ‘आधार’ या मतिमंद मुलांच्या संस्थेस गतवर्षी सर्व सभासदांनी भेट दिली. संकुलातील कंपाऊंडच्या भिंतीवर संकुलातील लहान मुलांनी ‘पृथ्वी संवर्धन’ या विषयावर चित्रे काढली आहेत. स्वच्छ भारत अभियान या योजनेंतर्गत संकुलातील सर्व सदस्यांनी संकुलात स्वच्छता मोहीम राबली.
पोषक वातावरण मिळाल्याने संकुलातील मुले उच्चशिक्षित आहेत. संकुलात आता १५० मुले असून त्यांच्यात कोणतीही दुफळी नसल्याने एकत्र विविध उपक्रम करत असतात. ख्रिश्चन, पारशी, मराठी असे विविध धर्मीय सदस्य येथे राहत असले तरी आमच्यात एक सामाजिक धागा आहे. कायद्याचे पालन येथे कसोशीने होते. मतभेद होत असले तरी सामंजस्य असल्याने संकुलात एकजूट आहे, असे मोहन लेले, शिशिर जोशी, राजन खेडेकर यांनी सांगितले.

प्रवेशद्वारापाशी कचऱ्याची समस्या

संकुलाच्या चारी बाजूस लोकवस्ती असल्याने प्रवेशद्वारापासून काही अंतरावर कचरा टाकण्यात येतो. अनेकदा तक्रार करूनही त्यावर कोणती अंमलबजावणी केली जात नाही. तिथला परिसर कचरा उचलून नेल्यानंतर स्वच्छ असावा, असे या संकुलातील सदस्यांना वाटते. संकुलाच्या मागच्या बाजूस मोकळी जागा असून त्या जागेची दुरुस्ती व स्वच्छता करण्याचा समितीचा विचार आहे.

सुविधांचा सुकाळ
खोपट हे ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने २००० पासून या परिसराचा झपाटय़ाने विकास होत गेला. कोकण, सातारा, नाशिक आदी ठिकाणी जाणाऱ्या गाडय़ांचे मुख्य एसटी स्थानक येथे उभारण्यात आले. सीएनजी गॅस फिलिंग व पेट्रोल पंपजवळच असल्याने सदस्यास सोयीस्कर पडते. ज्युपिटर आणि कौशल्य ही इस्पितळे काही पावलांवर आहेत. ठाणे महानगरपालिका हाकंच्या अंतरावर आहे. तसेच मेडिकल, शाळा, दुकाने, दवाखाने, नìसग होम अशा मूलभूत गरजा जवळपास आहेत. रेल्वे स्थानकापर्यंत शेयर रिक्षा व बसेसची सोय आहे. बोरीवली, विरार, दहिसर येथे जाण्यास बेस्टची सुविधाही आहे. ठाण्यातील किसननगर, वागळे, घोडबंदर, भिवंडी अशा विविध ठिकाणी जाण्यासाठी खोपट हा परिसर मोक्याचे ठिकाण आहे. मुंबई-नाशिक महामार्गापासून केवळ पाच मिनिटे व भविष्यात उभ्या राहणाऱ्या मेट्रो स्थानकापासून चालत जाणाच्या अंतरावर हा परिसर आहे. या परिसरातील वाढत्या सुविधा पाहता जागेचा भावही वाढला आहे. वसाहत उभारत असताना येथील १ ते २ लाखपर्यंत असणारी जागेची किंमत आता ८० ते ९० लाखांच्या घरात गेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pereira nagar in khopat thane

ताज्या बातम्या