रिक्षा तसेच टॅक्सीचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा आणि प्रवाशांना संबंधित चालकांची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी राज्याच्या परिवहन विभागाने सहा महिन्यांपूर्वी रिक्षा तसेच टॅक्सीमध्ये परवान्याची रंगीत प्रत लावण्याचे आदेश दिले होते. मात्र ठाणे शहरातील रिक्षाचालक या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र आहे. या मुजोर रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष मोहीम राबवून त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेत या आदेशाचे पालन करत नसलेल्या रिक्षाचालकाकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून रिक्षाचालकांची मुजोरी वाढलेली आहे. अशा मुजोर रिक्षाचालकांची प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार करण्यात येते. मात्र अनेकदा परवान्याचा मालक दुसरा आणि चालक भलताच असल्याचे दिसते. मूळ परवानाधारकाने दुसऱ्याला परवाना भाडय़ाने चालविण्यास दिलेला असतो आणि भाडय़ाने परवाना घेणारी व्यक्ती वाहनावर वेगळाच चालक कामावर ठेवतो, असेही निदर्शनास आले आहे. यामुळे संबंधित चालकाला शोधण्यासाठी परिवहन विभागापुढे अनेक अडचणी येतात. त्याशिवाय रिक्षा व टॅक्सीचा प्रवास महिलांसाठीही धोकादायक ठरू लागला आहे. गेल्याच आठवडय़ात दोन तरुणींना रिक्षाचालकांच्या वाईट वागणुकीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे रिक्षाचालकांचा शोध घेण्यासाठी त्यांचा परवाना असणे आवश्यक आहे.
या पाश्र्वभूमीवर राज्याच्या परिवहन विभागाने सहा महिन्यांपूर्वी रिक्षा तसेच टॅक्सीमध्ये परवान्याची रंगीत प्रत लावण्याचे आदेश दिले. रिक्षा तसेच टॅक्सीचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा आणि प्रवाशांना संबंधित चालकांची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी असे आदेश देण्यात आलेले असले तरी त्याची फारशी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.
शहरातील रिक्षाचालक या आदेशाकडे सर्रासपणे दुर्लक्ष करताना दिसून येतात. त्यामुळेच परिवहन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून यामध्ये बेकायदा रिक्षा आणि परवान्याची रंगीत प्रत लावण्याच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

काय आहे नियम?
वाहनाचा परवाना, चालकाचा वाहन परवाना आणि बॅच क्रमाक आदींची रंगीत  प्रत काढून तिला लॅमिनेशन करावे आणि ही प्रत चालकाच्या आसनाच्या पाठीमागे प्रवाशांना दिसेल व दोन्ही बाजूने वाचता येईल, अशा पद्धतीने लावण्यात यावी.

२७५ रिक्षांवर कारवाई
ठाणे शहरातील बेकायदा रिक्षांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात असून यामध्ये परवान्याची रंगीत प्रत लावत नसलेल्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसात या मोहिमेंतर्गत २७५ रिक्षांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे; तसेच ही मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे, अशी माहिती ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली.