ठाणे – देशातील काही भागांमध्ये इंधन तुटवड्याच्या चर्चांना वेग आला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर इंडियन ऑईलनेही महाराष्ट्रासह देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधनपुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. यामुळे नागरिकांनी इंधन तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन देखील इंडियन ऑईलच्या वतीने करण्यात आले आहे.
पश्चिम आशियातील देशांमध्ये सुरु असलेल्या लष्करी संघर्षाचे थेट परिणाम जगभरातील इंधन पुरवठ्यावर झाले आहेत. विविध देशांमध्ये इंधन तुटवडा जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना घाबरून न जाता इंधनाचा जबाबदारीने आणि गरजेनुसार वापर करण्याचे आवाहन केले आहे.
अनावश्यक साठेबाजी टाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि देशातील ऊर्जा व्यवस्था सक्षम असल्याने संयम राखावा, असे आवाहन त्यांनी केले. देशहित लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने इंधनाची बचत करणे हीदेखील राष्ट्रीय जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर दरम्यानच्या कालावधीत देशात इंधन तुटवडा असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
मात्र मे २०२६ मध्ये महाराष्ट्रात इंधनाच्या मागणीत मोठी वाढ झाली असूनही इंडियन ऑईलने प्रभावी नियोजन आणि सक्षम वितरण व्यवस्थेच्या जोरावर पुरवठा अखंड ठेवला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पेट्रोलच्या विक्रीत २२ टक्के वाढ झाली असून डिझेलच्या विक्रीत तब्बल ३३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तरीदेखील राज्यातील एकाही भागात इंधनटंचाई निर्माण होऊ नये यासाठी कंपनीने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. इतर पुरवठादारांच्या तुलनेत किंमतीतील फरक, व्यावसायिक ग्राहकांचा वाढता कल तसेच शेतीसंबंधित हंगामी कामांमुळे इंधनाची मागणी वाढल्याचे कंपनीने स्पष्ट केले. मात्र वाढत्या मागणीचा पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नसून राज्यातील सर्व इंधन पंपांवर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा नियमित पुरवठा सुरू असल्याचे इंडियन ऑईलने सांगितले.
इंधनपुरवठा अखंड सुरू ठेवण्यासाठी कंपनीकडून २४ तास कार्यरत विशेष नियंत्रण यंत्रणा उभारण्यात आली असून वाहतूक, साठवण आणि वितरण व्यवस्थेचा प्रभावी समन्वय साधला जात आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नसल्याची माहिती इंडियन ऑईलच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, देशभरात सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधनसाठा करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन इंडियन ऑईलकडून करण्यात आले आहे.
