रासायनिक सांडपाणी सोडण्याचे प्रकार सुरूच; पर्यावरणप्रेमींच्या चळवळीवर कारखान्यांचे पाणी

ठाणे : मुंबईतील मिठी नदीप्रमाणेच अनिर्बंध नागरीकरण आणि प्रदूषणाची बळी ठरलेली वालधुनी पुनरुज्जीवित करण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी लोकसहभागातून चळवळ सुरू केली असली तरी शासकीय स्तरावर याबाबतीत फारसा उत्साह दिसून येत नाही. वालधुनी नदीच्या प्रवाहात काठावरील कंपन्यांनी रासायनिक सांडपाणी टाकण्याचा उद्योग सुरूच ठेवला असून महाराष्ट्र दिनीही मोठय़ा प्रमाणात नदीपात्रातून मोठय़ा प्रमाणात दुर्गंधीयुक्त टाकाऊ रासायनिक सांडपाण्याचा विसर्ग सुरू होता. विशेष म्हणजे सांडपाण्याचे प्रमाण इतके जास्त होते की भर उन्हाळ्यात वालधुनी नदी पूर आल्याप्रमाणे दुथडी भरून वाहत होती. शनिवार ते मंगळवार चार दिवस शासकीय सुट्टी असल्याने संबंधित कंपन्यांनी घातक रसायने मोठय़ा प्रमाणात नदीपात्रात सोडली असल्याचा संशय पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केला आहे.

उल्हासनगर आणि अंबरनाथ या दोन शहरांच्या सीमारेषेवर असणाऱ्या वडोळ गावाजवळून वाहणाऱ्या वालधुनीच्या प्रवाहात मोठय़ा प्रमाणात घातक रसायने सोडण्यात आली. रात्री उशिरा हे रासायनिक सांडपाणी नदीपात्रात सोडून दिले जात होते. मात्र या सांडपाण्याची मात्रा जास्त असल्याने सकाळी उजाडल्यानंतरही ही घातक रसायने प्रवाहातून वाहत होती. सध्या पावसाळा नाही. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याला वेग नसतो. त्यामुळे कमालीच्या प्रदूषित असलेल्या वालधुनीतून काळेशार सांडपाणी संथपणे वाहत असते. मात्र सोमवारी रात्री मोठय़ा प्रमाणात रासायनिक सांडपाणी नदीपात्रात सोडल्याने ते अक्षरश: दुथडी भरून वाहत होते. लालसर रंगाच्या या पाण्यावर पांढरा शुभ्र फेस आला होता. नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर तो फेस पसरला होता. परिसरात दुर्गंधी पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर तसेच अंबरनाथमधील पर्यावरणप्रेमींनी त्वरित त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली व चित्रीकरणही केले.

वालधुनीतील विषारी सांडपाण्याविषयी अद्याप आमच्यापर्यंत माहिती आलेली नाही. कार्यालयाला सुट्टी आहे. तरीही तातडीने व्यवस्था करून नदीपात्रातून वाहणाऱ्या रसायनांचे नमुने गोळा करीत आहोत.

– मंचक जाधव, क्षेत्रीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.