कल्याण – घरपोच वृत्तपत्र पोहचविण्याचे काम करणाऱ्या एका वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलावर एका पाळीव श्वानाने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. या प्रकरणी वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात पाळीव श्वानाच्या मालका विरूध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्यावरील रोशन पेट्रोल पंपासमोरील एका गृहसंकुलात हा प्रकार रविवारी घडला आहे. पाळीव श्वान हल्ला प्रकरणी खासगी नोकरदार आणि वृत्तपत्र घरपोच सेवक मंगेश संजय पेटकर यांनी पाळीव श्वानाचे मालक विकास लोंढे यांच्या विरूध्द तक्रार केली आहे.
पोलीस ठाण्यात वृत्तपत्र घरपोच सेवक मंगेश पेटकर यांनी म्हटले आहे, की माझे वडील संजय पेटकर हे अनेक वर्षापासून कल्याणमध्ये वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या या कामात मदत म्हणून मी त्यांना सकाळच्या वेळेत साहाय्य करतो. रविवारी मी सकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे मुरबाड रस्त्यावरील रोशन पेट्रोल पंपासमोरील निसर्ग रेसिडेन्सी संकुलात वृत्तपत्र ग्राहकांना वर्तमानपत्र देण्यासाठी गेलो होतो.

सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान मी निसर्ग रेसिडेन्सीमधील ग्राहकांंना वर्तमानपत्र टाकत असताना सहाव्या माळ्यावरून वर्तमानपत्र टाकून, विकास लोंढे यांच्या घराच्या दरवाजाच्या कडीला वर्तमानपत्र अडकवले. त्यानंतर तळमजल्याला येण्यासाठी मी उदवाहनाची वाट पाहत उभा होतो. तेवढ्यात विकास लोंढे यांच्या घरातून अचानक त्यांचा पाळीव पिटबुल श्वान बाहेर आला. त्याने माझ्यावर भुंंकून झडप घातली. आणि त्याने माझ्या हात, पाय, तळवा, पोटरीला चावे घेऊन दुखापत केली. मला रक्तस्त्राव सुरू झाला.

मी बचावासाठी ओरडत असताना श्वान बाहेर आलेल्या घरातून विकास लोंढे आणि एक महिला बाहेर आली. त्यांनी श्वानाला पकडून आत नेले. त्यानंतर मी चौथ्या माळ्यावर आलो. तेथून उदवाहनाने तळमजल्याला आलो. मी वडिलांचा वृत्तपत्र विक्रीचा मंच असलेल्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगाराला तात्काळ घटनास्थळी बोलावून घेतले. रक्तस्त्राव सुरू होता. त्याने मला तात्काळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपाचारासाठी नेले. तेथे माझ्यावर उपचार करण्यात आले.

संबंधित पाळीव श्वानाच्या मालकाने आपला श्वान मानवी जीवितास धोका निर्माण करणार नाही यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. पण त्यांनी अशी कोणतीही उपाययोजना न केल्याने आपल्या जीवितास धोका निर्माण झाला म्हणून मंगेश पेटकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मंगेश हे एका खासगी कंपनीत उच्चपदस्थ आहेत.