scorecardresearch

डोंबिवली एमआयडीसीतील बस थांब्यांसमोरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल

प्रवाशांना वाहन वाहतुकीच्या भागात उभे राहून रिक्षा, बस पकडून प्रवास करावा लागतो.

Dombivali bus stop
एमआयडीसीतील बस थांब्याची दुरवस्था आणि थांब्यांसमोर साचलेले पाणी.

डोंबिवली एमआयडीसीतील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. बस थांब्यांसमोरील रस्त्यांवर खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचते. त्यामुळे थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना वाहन वाहतुकीच्या भागात उभे राहून रिक्षा, बस पकडून प्रवास करावा लागतो.

डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर, सुदर्शननगर, निवासी भागात बस थांबे आहेत. थांब्यांवर कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बस थांबतात. या थांब्यांवर एमआयडीसी, डोंबिवली परिसरातील शाळांमधील विद्यार्थी, पालक, नोकरदार, कंपनी अधिकारी, कामगार यांची वर्दळ असते. पाऊस सुरू असला की बस थांब्यांसमोरील खड्डे पावसाने भरून जातात. अनेक वेळा बस थांब्यावर येऊन उभी राहताना टायरचे पाणी अंगावर उडते, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.

खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत –

प्रवाशांना होणारा त्रास विचारात घेऊन एमआयडीसी भागातील बस थांब्यांवरील खड्डे, खळगे तातडीने बुजविण्यात यावेत, अशी मागणी प्रवासी करतात. शहरात स्टीलचे चकाचक बस थांबे बसविण्यात आले आहेत. अशा प्रकारचे थांबे निवासी विभागात बसविण्यात यावेत. संध्याकाळच्या वेळेत अनेक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा म्हणून बस थांब्यांमध्ये येऊन बसतात. त्यांची बस थांब्यांसमोर पाणी तुंबले की येजा करताना अडचण होते, असे कृत्तिका रानडे हिने सांगितले. अनेक शाळा चालकांनी पालिका, एमआयडीसी अधिकाऱ्यांना संपर्क करून वर्दळीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे. अनेक वेळा या बस थांब्यांमध्ये गर्दुल्ले, भिकारी झोपलेले असतात. भटकी कुत्री याठिकाणी बसलेली असतात.

रस्त्यांची कामे अतिशय संथगतीने सुरू –

‘एमआयडीसीतील निवासी भागातील रस्ते काँक्रीटीकरणाचे काम एमएमआरडीएतर्फे करण्यात येणार आहे. या कामासाठी ५७ कोटीचा निधी प्रस्तावित आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. कामाचे आदेश झाले की पावसाळ्यानंतर ही कामे सुरू केली जातील,’ असे प्राधिकरणातील एका अधिकाऱ्याने सांगितले. एमआयडीसीतील औद्योगिक भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण एमआयडीसीकडून सुरू आहे. ही कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने उद्योजक, या भागातील रहिवासी नाराजी व्यक्त करतात.

… तर नवीन थांबे तेथे बसविण्याचा निर्णय तत्काळ घेतो –

केडीएमटी उपक्रमाच्या बस जेथे धावतात. तेथील बस थांब्यांची जबाबदारी परिवहन उपक्रमाची आहे. जेथे प्रवाशांची गैरसोय होते. तेथे तत्काळ नवीन बस थांबे बसविले जातात. एमआयडीसीत बस थांब्याविषयी प्रवाशांच्या, विद्यार्थी, शाळा चालकांच्या काही तक्रारी असतील तर त्या थांब्याची परिस्थिती पाहून नवीन थांबे तेथे बसविण्याचा निर्णय तत्काळ घेतो. असे साहाय्यक परिवहन व्यवस्थापक संदीप भोसले म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pitfalls in front of bus stands at dombivli midc msr

ताज्या बातम्या