बदलापुरात दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महापुराच्या कटू आठवणी पुसून शहरात निसर्गाची वृद्धी करावी या हेतूने दीड हजार झाडे लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे वृक्ष दहा फूट उंचीचे आहेत, अशी माहिती या उपक्रमाचे निमंत्रक भाजप पालिकेतील गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले.
२६ जुलैच्या महापुरात बदलापूर शहरात अनेक इमारती एक ते दोन मजले पाण्यात गेल्या होत्या. शहरात मोठय़ा प्रमाणावर जीवित व वित्तहानीही झाली होती. यावेळी शहरातील पूरग्रस्त भागात प्रदूषणाची समस्या होती, तर पावसाचे पाणी रोखण्यासाठी नैसर्गिकरीत्या काम करणाऱ्या झाडांची संख्याही कमी होती. हाहाकार घडवून आणणाऱ्या या महापुराला रविवारी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या पुराचा फटका ज्या हेंद्रेपाडा विभागाला बसला होता, तेथे हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दहा फूट उंच असेलेल हे वृक्ष तीन फूट खोल खड्डा खणून लावण्यात येणार आहेत. जेणेकरून पावसाळ्यात त्यांना पाणी मिळून त्यांची वाढ होईल. ही मोहीम पुढील चार दिवस चालू राहणार असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.