ठाणे : बदलापूर येथील चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर या प्रकरणाचे पडसाद आता उमटू लागले आहे. ठाण्यात भाजपच्या भव्य अशा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर फलक उभारण्यात आला आहे. ‘तुम्हाला लाज वाटत नाही का, लाज.. असा प्रश्न या फलकावर विचारण्यात आला आहे. बाहेरील देशात हिंदूवर झालेल्या अन्यायाविरोधात निषेध आंदोलन केले. पण बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराचा निषेध करत नाही, कारण शाळेचा संचालक भाजपचा आहे असा थेट आरोप या फलकामध्ये करण्यात आला आहे.
बदलापूर शहरात एका नामांकित शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेनंतर बदलापूरमध्ये उत्स्फूर्त आंदोलन झाले. तसेच रेल रोको करण्यात आला. महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत आंदोलकांनी सरकारच्या प्रतिनिधींना जाब विचारला होता. ठाण्यातही याचे पडसाद उमटले होते. मंगळवारी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. बुधवारी देखील याचे पडसाद पाहायला मिळाले. ठाण्यात भाजपचे वर्तकनगर येथील चौकात भव्य असे जिल्हा कार्यालय आहे. या कार्यालयासमोर माहिती अधिकार कार्यकर्ता अजय जेया यांनी एक फलक उभारले आहे.
हेही वाचा…चिमुकल्यांच्या अत्याचाराचे ” विकृत राजकारण नको”, बदलापुरात ठिकठिकाणी झळकले फलक
‘तुम्हाला लाज वाटत नाही का, लाज.. तुम्ही काल संध्याकाळी बाहेर देशातील हिंदूसाठी स्थानक परिसरात निषेध आंदोलन केले. पण भारतातील, महाराष्ट्रातील तेही ठाणे जिल्ह्यातील बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण निषेध करता आला नाही. कारण शाळेचा संचालक भाजपचा आहे म्हणून का? ज्या चिमुकलीवर अन्याय झाला, ती सुद्धा हिंदू होती असे या फलकावर म्हटले आहे. या फलकावर स्थानक परिसरात आंदोलन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचेही छायाचित्र आहे. भाजपच्या कार्यालयासमोरच हा फलक असल्याने हा फलक ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.