जलशुद्धीकरण केंद्रात प्लास्टिक कचऱ्याचा ढीग; पाणी उचल क्षमतेवर परिणाम, नदी-नाल्यात कचरा टाकण्यावर निर्बंध नाहीच

शहरातील नाल्यांमध्ये थेट फेकला जाणारा आणि पुढे जाऊन नदीपात्राला मिळणारा कचरा जलशुद्धीकरण केंद्रांना डोकेदुखी ठरतो आहे.

plastic waste
प्लास्टिक कचऱ्याचा ढीग

बदलापूरः शहरातील नाल्यांमध्ये थेट फेकला जाणारा आणि पुढे जाऊन नदीपात्राला मिळणारा कचरा जलशुद्धीकरण केंद्रांना डोकेदुखी ठरतो आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा कचरा मोठ्या प्रमाणावर वाहून आला असून अंबरनाथजवळील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात पाणी उचल करण्याच्या ठिकाणी  या कचऱ्याचा ढीग गोळा झाला आहे. या प्लास्टिकमुळे पाणी उचल क्षमतेवर परिणाम होतो आहे. हा कचरा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचा वेळही जातो आहे.

केंद्र आणि राज्य शासनाने लागू केलेली प्लास्टिकबंदी कागदावरच राहिल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. आजही अनेक शहरांमध्ये नाल्यांमध्ये थेट कचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचा फटका जलस्त्रोतांना बसतो आहे. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणातून उल्हास नदीत पाणी सोडले जाते. या उल्हास नदीवर अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या वेशीवर आपटी येथे बंधारा आहे. या बंधाऱ्याहून पाण्याची उचल करून हे पाणी जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. तेथून या पाण्यावर प्रक्रिया करून भव्य जलवाहिन्यांद्वारे ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिकांपर्यंत पोहोचवले जाते. मात्र नदी पात्रात होणाऱ्या प्रदुषणाचा या जलशुद्धीकरण केंद्राला फटका बसतो. या केंद्राच्या आधी बदलापूर, वांगणी, नेरळ, कर्जत अशी शहरे आहेत. या शहरांमधून मोठ्या प्रमाणावर आजही कचरा थेट उल्हास नदीत टाकला जातो. प्लास्टिक आणि कचऱ्यामुळे असाच फटका पुन्हा एकदा या जलशुद्धीकरण केंद्राला बसतो आहे. आपटी  बंधाऱ्याजवळ असलेल्या पाणी उचल ठिकाणावर लावण्यात आलेल्या जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा गोळा झाला आहे. पावसामुळे हा कचरा या जाळ्यांमध्ये येऊन अडकला आहे. त्यामुळे पाणी उचल क्षमतेवर त्याचा परिणाम होतो आहे. हा कचरा काढण्यासाठी मनुष्यबळ लागते आहे. येथून काढला जाणाऱ्या कचऱ्याचे ढीग  लागले आहेत, अशी माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कचऱ्यामुळे येथील यंत्रणा ठप्प होण्याची भीती आहे. आधीच पावसामुळे नदीचे पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे त्यावर प्रक्रियेसाठी अधिक वेळ द्यावा लागतो. त्यात कचऱ्यामुळे या  पाणी शुद्धीकरण प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होते आहे. त्यामुळे नाले आणि नदीमध्ये थेट कचरा टाकण्यापासून नागरिकांना रोखण्याची गरज व्यक्त होते आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Plastic waste water no restrictions dumping waste rivers streams ysh

Next Story
मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी
फोटो गॅलरी