ठाणे : आमचे सरकार शीखांचे सन्मान आणि न्यायासाठी प्रतिबद्ध होऊन काम करत आहे. या वचनबद्धतेमुळे १९८४ च्या दंगलीसाठी आम्ही विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत केले आणि बंद पडलेले प्रकरण पुन्हा उघडले. या प्रकरणातील अनेक दोषींना शिक्षा देण्यात आली. १९८४ च्या पिडीत कुटुंबियांना अतिरिक्त भरपाई घोषित केली असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या वतीने रविवारी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम या कार्यक्रमाये आयोजन नवी मुंबई येथील ओवे मैदानात करण्यात आले होते. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य पद्धतीने त्यांचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित होते.

कर्तारपूर साहिब काॅरिडाॅर विक्रमी वेळेत पूर्ण करणे, हेमकुंड साहिब यात्रेसाठी नव्या सुविधेचे निर्माण, शीख संघटन आणि गुरुद्वारासंबंधी अनेक संस्थांना ‘एफसीआरए’मध्ये दिलासा, शीख इतिहासाला अभ्यासक्रमात स्थान देणे अशी अनेक कामांची प्रतिक्षा शीख बंधू-भगिनींना दशकांपासून होती. त्यास पूर्ण करण्याचे सौभाग्य आम्हाला प्राप्त झाले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अफगाणिस्तानातील शीख बंधूच्या सुरक्षा आणि गुरु ग्रंथ साहिब यांच्या सन्मानाचा प्रश्न आल्यानंतर आमच्या सरकाने मिशन मोडमध्ये काम केले. गुरु ग्रंथ साहिब ग्रंथाला सुरक्षित, सन्मानपूर्व परत आणले. अफगान शीख आणि हिंदूंना नागरिकता देण्याचा रस्ता तयार केला. शीख शरणार्थींना दिलासा दिला. काळ्या यादीत टाकलेल्या हजारो शीखांचे नाव काळ्या यादीतून हटविले. प्रवासी शिखांना भारतात ये-जा करण्याची प्रक्रिया सुरळीत केली. शीख समाजाच्या आस्थेचा सन्मान, त्यांच्या प्रगतीच्या नव्या संधीचे निर्माण ही आमची जबाबदारी मानत असल्याचेही ते म्हणाले.

पंजाबमध्ये धर्म परिवर्तन होत असल्याचे या मंचावरून सांगण्यात आले. हा योग्य मंच आहे, जिथे महान गुरुंची श्रद्धांजली देण्यासाठी आलो आहोत. ज्या गुरुंनी इतर धर्मियांसाठी आपले बलिदान दिले. ते अत्याचारासमोर झुकले नाही. परंतु आता लोभ आणि लालसेपोटी धर्म परिवर्तन करत असल्यास आपण दशम पिताचे अनुयायी मानले जाऊ नये. पंजाब सरकारने तसेच इतर धर्मियांनी एकत्र येऊन पंजाबमधील धर्म परिवर्तन रोखले पाहिजे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

धार्मिक स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवतेच्या मूल्यांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादूर सिंह यांच्या जीवनकार्याचा आणि बलिदानाचा समावेश राज्यातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात येणार आहे. नव्या पिढीला भारतीय इतिहासातील धर्मस्वातंत्र्याच्या लढ्याची जाणीव व्हावी, विविध धर्मांचा परस्पर सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्याच्या अभ्यासक्रमात आवश्यक बदल करून गुरु तेग बहादूर यांच्या कार्याचा स्वतंत्र धडा किंवा सविस्तर उल्लेख समाविष्ट केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

१९८४ मध्ये तत्त्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात शीखांविरोधात दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शीखांच्या संरक्षणासाठी शिवसैनिकांना रस्त्यावर उतरविले होते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानाची आठवण करून देत ‘कोणालाही घाबरायचे नाही आणि कुणालाही घाबरवायचे नाही’, हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगितले. विचाराच्या धारेला आणि बलिदानाच्या शक्तीला त्यांनी दिलेले महत्त्व समाजासाठी प्रेरणादायी ठरते, असेही त्या म्हणाल्या.