नवी मुंबई : श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई येथे ‘हिंद- दी- चादर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थिती करण्याचे नियोजन आखत त्याप्रमाणे कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हे दूरदृष्य प्रणाली (ऑनलाईन) द्वारे उपस्थिती लावणार आहे तर, गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

नवी मुंबई येथील खारघर भागातील ओवे मैदानात २८ फेब्रुवारी तसेच १ मार्च या दिवशी ‘हिंद- दी- चादर’ कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात देश विदेशातून १८ ते २० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थिती करण्याचे नियोजन आखत त्याप्रमाणे कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू होती.

मुंबई महानगरात कार्यक्रमाच्या जाहीरातीसाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. डिजीटल जाहीराती करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेकडून कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भव्य मंडप, वाहनतळ, बसगाड्या, हेलीपॅडची व्यवस्था, भाविकांची निवास व्यवस्था, तात्पुरती स्वच्छतागृहे आणि आरोग्य पथके तैनात केली जाणार आहेत. या कार्यक्रमाकरीता ठाणे आणि नवी मुंबई शहरात वाहतूक बदल लागू करण्यात आले असून अवजड वाहनांना पुर्णपणे वाहतूकीस बंदी असणार आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जम्मू-काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिग सैनी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, तामीळनाडू येथील भाजपा नेते अण्णामलाई, योग गुरु बाबा रामदेव, बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री, दीदी मा साध्वो ऋतंभरा उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले असून ते दूरदृष्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाला उपस्थिती लावून उपस्थितांना संबोधित करणार आहेत. तसेच गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीबाबत साशंकता व्यक्त होत आहे.