कल्याण – अमेरिका-इराण युध्दजन्य परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या देशातील आगामी आर्थिक संकटांची चाहूल विचारात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर, बचतीचे अनेक मार्ग हाताळण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. यामध्ये पुढील वर्षभर सोने न खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक मास (धोंड्याचा महिना) सुरू होण्याच्या कालावधीत पंतप्रधानांनी हे आवाहन केल्याने जावई बापूंमध्ये मात्र अस्वस्थेतेचे वातावरण आहे.

अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना या महिन्यात सासरेबुवांकडून जावई बापूंना भरभरून सोने, चांदीचे वाण देण्याची प्रथा आहे. सोबत गोड पदार्थ त्यात अनारसेंना सर्वाधिक पसंती या महिन्यात असते. अधिक महिना आला की अनेक जावईबापू सासरच्या बोलावण्याकडे नजर ठेऊन असतात.

जावईबापूंचा खिसा किमती वस्तू देऊन गरम करण्याचा, तसेच हाताची बोटे चमचमीत करण्याचा महिना म्हणून धोंड्याचा महिना ओळखला जातो. आता जावईबापूंना धोंड्याच्या महिन्यात द्यावे लागेल म्हणून सासरची आर्थिक परिस्थिती बेताची असलेली मंडळी थोडी अस्वस्थ असतात. परिस्थिती दांडगी असलेली मंडळी मात्र जावई बापूंची भरपूर ऐवज देऊन सरबरई करतात.

मोदींचे आवाहन

मागील तीन महिन्यांपासून अमेरिका-इराण युध्दामुळे युध्दजन्य परिस्थितीचे सावट जगावर आहे. भारताला त्याचा विविध बाबतीत फटका बसला आहे. युध्दाचे सावट येणार्‍या काळात गंभीर परिस्थिती निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमीच दूरदृष्टीचा विचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिक मास सुरू होण्याच्या कालावधीत देशवासियांना इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा वापर करा, पुढील वर्षभर सोने खरेदी टाळा, परदेशी प्रवास टाळण्याची, घरून कार्यालयीन कामाला महत्व, विद्युत वाहनांचा वापर करा, परकीय चलन बचतीवर भर द्या, खाद्य तेलाचा वापर कमी करा अशी आवाहने केली आहेत.

देशातील बहुतांशी नागरिक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील, सांगतील त्याप्रमाणे कृती करतात. त्याप्रमाणे वागतात. अशा अनेकांच्या गळ्यातील मोदी हे ताईत आहेत. अशा परिस्थितीत अशा मोदी भक्त घरातील सासरेबुवांनी मोदींचा काटकसर, बचतीचा मार्ग काटेकोरपणे अवलंबला तर आपल्याला अधिक मासात सासरेबुवांकडून मिळणारा सोने, चांदीचा किंमती ऐवज मिळणे अवघड असल्याची चिन्हे दिसू लागल्याने कट्टर मोदी भक्त घरांचे जावईबापू अस्वस्थ आहेत. ‘आता अधिक मास सुरू झाला आहे. पण यंदा सासरच्या मंडळींकडून वाण घेण्यासाठी बोलविणे येते की नाही,’ अशी जावईबापूंची चिंता आहे.

कट्टर मोदी भक्त सासरच्या मंडळींनी मोदींची तत्त्वे काटेकोर पाळण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जावईबापूंना या वेळी अधिक मासात किमती वाण वगैरे देण्याची गरज नसल्याचे समाधानाचे दृश्य आहे.

कट्टर मोदी भक्तांच्या घरात नव्याने सोने, चांदी खरेदी करून ती जावईबापूंना दिली जाते की नाही. की मोदींचा आवाहनाला दुर्लक्षित केले जाते याकडे अनेकांच्या नजरा आहेत. काही सराफांनी मोदी सांगतील त्याप्रमाणे कृती करणारे देशातील अनेक नागरिक आहेत. त्यामुळे या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अनेक जण सोने, चांदी खरेदीसाठी येतात की नाही याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे, असे सांगीतले.