वाळूमाफियांवर कारवाई करण्यात प्रशासन, पोलीस अपयशी
पालघर जिल्ह्यात होणारा रेती उपसा हा प्रकार नवीन नाही, परंतु आता वाळूमाफियांनी पुन्हा सक्शन पंपाद्वारे वैतरणा पुलाखालील रेती काढण्यास सुरुवात केल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. रेल्वेने पुन्हा एकदा पत्राद्वारे या पुलाला झालेल्या धोक्याकडे लक्ष वेधले आहे. मात्र वाळूमाफियांवर कारवाई करण्यास पोलीस आणि प्रशासन अपयशी ठरले आहे.
पालघर जिल्ह्यातीेल पूर्वेकडे असणाऱ्या खाडीत गेल्या अनेक वर्षांपासून रेतीचा व्यवसाय केला जातो. पारंपरिक म्हणजे डुबी पद्धतीने रेती उत्खनन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र वाळूमाफियांनी बेकायदेशीरपणे सक्शन पंप लावून रेती उपसा करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आणि महसूल विभागाच्या संगनमताने हा वाळूउपसा होत असतो. याच वैतरणा खाडीवर पश्चिम रेल्वेचा पूल क्रमांक ९२ आहे. याठिकाणी सक्शन पंप लावल्याने एकाच वेळी हजारो ब्रास रेती एकाच वेळी काढली जाते. त्यामुळे त्या पुलाच्या खांबाखालची जागा खिळखिळी होत असून त्याचा पुलाला धोका निर्माण झाला आहे. याविषयी सामाजिक संघटना आणि वसई तालुका रेती उत्पादक संघटनेने वारंवार तक्रारी केल्या होत्या, पण तात्पुरत्या कारवाईशिवाय काहीही झाले नाही.
हा वैतरणा पूल मुंबई आणि गुजरातला जोडणारा सर्वात महत्त्वाचा पूल मानला जातो. काही महिन्यांपूर्वी पुलाचा काही भाग कोसळल्याने लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. या संदर्भात पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांनी राज्य सरकारला पत्र पाठवून वाळूउपसा रोखण्याची मागणीही केली होती. यापूर्वीही २०११ मध्ये या पुलाचा काही भाग कोसळला होता. या पुलाजवळ वाळूमाफियांसैाठी संरक्षक जाळ्या उभारण्यात आल्या होत्या. त्यासुद्धा काढण्यात आल्या आहेत. एवढा गंभीर धोका दिसत असताना कारवाई होत नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
उत्तन येथून पहाटेच्या वेळी खाडीत प्रवेश करून वाळूचोरी केली जात आहे. भाईंदर खाडी पुलाखालूनही वाळूचोरी होत असल्याने या पुलालाही धोका निर्माण झाला आहे. पालघरचे जिल्हाधिकारी बांगर यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.