३१ डिसेंबरला मॉल परिसरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलीस दक्ष; संपूर्ण परिसरात शीघ्र कृती दलाची पथके तैनात

प्रतिनिधी, ठाणे</strong>

सणासुदीला ठाण्यातील मॉलमध्ये होणारी गर्दी, त्यामुळे परिसरातील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी आणि त्याचा शहरातील अन्य रस्त्यांवर दिसणारा परिणाम यांतून धडा घेत ठाणे पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी वाहतूक नियोजनासाठी कंबर कसली आहे. ठाण्यातील महामार्गालगत असलेल्या मॉलमध्ये येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचना पोलिसांनी मॉल व्यवस्थापनांना केल्या आहेत. तसेच या संपूर्ण परिसरातील कोंडी आवरण्यासाठी शीघ्र कृती दलाची पथकेही नेमली जाणार आहेत.

ठाणे शहराला विभाजून जाणाऱ्या महामार्गालगत उभ्या राहिलेल्या मॉलमध्ये सणासुदी तसेच इतर सुट्टीच्या काळात मोठी गर्दी ओसंडते असा अनुभव आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमधील उत्सवप्रिय नागरिक या मॉलमध्ये गर्दी करत असतात. शहरात येणाऱ्या वाहनांचे प्रमाण या काळात अचानक दुप्पट, तिपटीने वाढते. गेल्या काही महिन्यांपासून महामार्गालगत मेट्रोची कामे सुरू असून घोडबंदर तसेच आसपासच्या परिसरात भुयारी गटार योजनेतील वाहिन्या टाकण्यासाठी जागोजागी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे एरवी देखील तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, घोडबंदर मार्गावर मोठी वाहनकोंडी होत असते. नाताळनिमित्त गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस शहरभर मोठी वाहनकोंडी झाली. त्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. हा अनुभव लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी यंदा ३१ डिसेंबर रोजी विशेष खबरदारी घेतली असून वाहतूक नियोजनासाठी खास पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मॉलमधील वाहनतळ व्यवस्था आणि नियोजनाकडे काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचनाही व्यवस्थापनांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.

थर्टी फर्स्ट’साठी विशेष बंदोबस्त

’ ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या शहरांमध्ये ४ हजार पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

’ ३१ डिसेंबरच्या सायंकाळी ६ वाजेपासून पोलिसांची नाकाबंदी सुरू असणार आहे.

’ येऊरच्या प्रवेशद्वारावर पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच घोडबंदर, तलावपाळी तसेच ज्या ठिकाणी कार्यक्रम किंवा पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. यात एक अधिकारी आणि १० कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.

’ मद्य पिऊन गाडी चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पथके तयार केली आहेत. मॉलमधील घातपात रोखण्यासाठी तसेच गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांचे शीघ्र कृती दलही तैनात असणार आहे.

’ बारमध्ये येऊन मद्य प्राशन करणाऱ्या मद्यपीला घरापर्यंत पोहचविण्यासाठी चालकाची आणि वाहनांची व्यवस्था करण्याच्या सूचना पोलिसांनी बार मालकांना दिल्या आहेत.

’ पाटर्य़ामध्ये मिश्रित मद्याचा वापर केला जाऊ नये यासाठी उत्पादन शुल्क विभागाची सात पथके तैनात करण्यात आली आहेत. पाटर्य़ाच्या ठिकाणी जाऊन उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी येथील मद्याची तपासणी करणार आहेत.

ठाणे शहर पोलिसांनी ३१ डिसेंबरचा बंदोबस्त ठेवला असून पाटर्य़ामध्ये गैरप्रकार रोखणाऱ्यांसाठी पोलीस सज्ज झाले आहेत. नववर्षांचे स्वागत तरुणांनी उत्साहात करावे, परंतु उत्साहावर विरजन पडेल असे कृत्य कोणीही करू नये.

 बाळासाहेब पाटील, उपायुक्त, विशेष शाखा