गेल्या काही दिवसापासून कोपर, ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरात जेष्ठ नागरिकांना लुटण्याच्या घटनेत वाढ झाली होती. संध्याकाळच्या वेळेस फिरण्यासाठी आलेल्या किंवा शतपावली करणाऱ्या वृद्धांना एकटे गाठून त्यांच्या जवळचा मोबाईल काढून घेणे, गळ्यातील सोनसाखळी हिस्कावून पळून जाण्यासारख्या घटना घडत होत्या. या प्रकरणी पोलिसांनी एका भुरट्या चोराला पकडले आहे. त्याच्याकडून दोन महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत.

बेरोजगारी, व्यसनांचा हा परिणाम
चंदन विनोद बिरगोडे (२४, रा. आर. के. पॅलेस, जुनी डोंबिवली) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. गेल्या आठवड्यात कोपर येथील सखारामनगर संकुलातील एका तरूणाला पोलिसांनी मोबाईल चोरी करताना पकडले होते. सुस्थितीत कुटुंबातील मुले आता चोऱ्या करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. बेरोजगारी, व्यसनांचा हा परिणाम असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार अधिक
डोंबिवली पश्चिमेतील नाना शंकर शेठ रस्त्यावरील सहवास इमारतीत राहणारे मोहन सुतावणे (वय ७८) सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. हातामध्ये मोबाईल होता. नेहमीप्रमाणे चालत असताना अचानक पाठीमागून एक तरूण आला. त्याने मोहन यांना काही कळण्याच्या आत त्यांच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळ काढला. मोहन यांनी चोर म्हणून ओरडा केला. तोपर्यंत तो पळून गेला. त्यानंतर मोहन सुतावणे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

एका भुरट्या चोराला अटक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी गुन्हे शोध पथकातील सुभाष नलावडे, शशिकांत नाईकरे, कैलास घोलप, कुंदन भामरे यांना शहरातील मुख्य वर्दळीच्या चौकात गस्त घालण्याची सूचना केली. हे पथक वर्दळीच्या ठिकाणी गस्त घालत असताना एक तरूण संशयास्पदरीत्या रेल्वे स्थानक भागातून वेगाने पळत होता. त्याच्या पाठीमागून दोन ते तीन जण त्याला पकडण्यासाठी धावत होते. धावत असणारा चोर आहे हे पोलिसांना समजताच गस्ती पथकातील पोलिसांनी एकमेकांना इशारे करून धावणाऱ्या तरूणाचा पाठलाग सुरू करून त्याला अडविले. का पळतोस? असा प्रश्न पोलिसांनी केला. तो निरूत्तर झाला. त्याच्या हातात मोबाईल होता. त्याला अटक करताच आपण मोबाईल चोरला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्याच्याकडून दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले. त्यामध्ये एक मोबाईल मोहन सुतावणे यांचा होता. चंदन बिरगोडे याने आतापर्यंत किती जणांचे मोबाईल चोरले आहेत याचा तपास हवालदार सुभाष नलावडे करत आहेत.