राज्यात आणि केंद्रात शिवसेनेसोबत असलेली भाजप पहिल्यांदाच ठाण्याच्या सत्तेतून बाहेर आहे. तेव्हा, इतकी वर्षे ठाण्यातील खड्यांसाठी आंदोलन तर सोडाच किंबहुना सभागृहात साधा निषेधाचा चकार शब्द न काढणाऱ्या भाजपने आज चक्क ठाण्यात रस्त्यांवरील खड्यांविरुद्ध आंदोलनाचा फार्स उरकला. ठाण्यातील तीन पेट्रोलपंप परिसरात खड्यांचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून खड्यांमध्ये रोप लावून त्याला पुष्पगुच्छ अर्पण केले. विशेष म्हणजे, हा परिसर नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत येत असून या प्रभागातील चारही नगरसेवक भाजपचेच आहेत. एकीकडे भाजपचा हा फार्स सुरु असताना ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे कर्मचारी रस्त्यावरील हे खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत असल्याने भाजपची स्टंटबाजी उघड्यावर पडली. या आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी चक्क वाहतूक पोलिसांनीच खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

ठाण्यातील नौपाडा येथील तीन पेट्रोल पंप हे ठाण्याचे हृदय असून याच ठिकाणच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या परिसरात दोन पेट्रोलपंप तसेच जवळच प्रसूती रुग्णालय जवळच आहेत. त्यामुळे खड्यांमुळे पडून रोज अपघात होत असतात याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वळविण्यासाठी भाजपच्यावतीने खड्यांमध्ये झाडे लावा आंदोलन करण्यात आल. जर आशीच परिस्थिती राहिली तर पुढे जाऊन या खड्यांचे श्राद्ध घालावे लागणार असल्याचेही भाजपकडून सांगण्यात आले. या आंदोलना दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पालिका प्रशासनाला जाग आली नसली तरी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी चक्क वाहतूक पोलिसांनीच खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे केंद्र सरकारने ठाणे शहराला स्मार्ट सिटी घोषित करत असताना भाजपच्याच नगरसेवकांनी अशा प्रकारे आंदोलन केल्यामुळे भाजपची ही स्टंटबाजी तर नाही ना अशी चर्चा ठाणेकरांमध्ये रंगली आहे.