ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अज्ञात राजकीय नेते तसेच अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने महापालिकेचे कामकाज एकीकडे चौकशीच्या फेऱ्यात सापडले असतानाच मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रेक्षकांसाठी राखीव असलेल्या दालनात साध्या वेशातील पोलीस अवतरल्याने नगरसेवकांची काही काळ भंबेरी उडाली. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राम कापसे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत ही सभा तहकूब करण्यात आली. मात्र सभेनिमित्त महापालिका मुख्यालय परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कॉसमॉस या बांधकाम क्षेत्रातील कंपनीचे मालक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही राजकीय नेत्यांची नावे आहेत, मात्र ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच उघड होणार असली तरी ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी सुरू केला आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या बैठकींमध्ये कॉसमॉस बांधकाम प्रकल्पांसंबंधी आतापर्यंत झालेल्या चर्चेची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. परमार यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर मंगळवारी महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा होती. या सभेमध्ये परमार आत्महत्येप्रकरणी तसेच कॉसमॉस बांधकाम प्रकल्पांसंबंधी चर्चा होईल, अशी शक्यता वाटत असल्याने ठाणे पोलिसांचे विशेष पथक महापालिकेत दाखल झाले आणि या पथकाची सर्वसाधारण सभेतील कामकाजावर करडी नजर होती. याशिवाय, महापालिकेच्या परिसरात पोलीस तसेच सुरक्षारक्षकांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.