समाजकंटकांकडून त्रास देण्याचे प्रयत्न; कारवाई करण्याचा इशारा

पोलीस ठाण्यावर मोर्चे काढण्याचे प्रमाण वसईत वाढले असून पोलिसांवर दबाव टाकण्याची ही नवी प्रवृत्ती वाढीस लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांत वसईतील विविध पोलीस ठाण्यावर काढण्यात आलेले मोर्चे आणि घेराव हे परप्रांतीयांकडूनच होत आहेत. समाजकंटक या मोर्चाआडून पोलिसांना लक्ष्य करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

नालासोपारा येथील अंजली सरोज या चिमुकलीच्या हत्येनंतर संतप्त जमावाने तुळींज पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन घेराव घातला होता. तब्बल चार तास पोलीस ठाण्याला घेराव घालून निदर्शने करण्यात आली होती. यामुळे पोलिसांच्या कामातही अडथळा आला होता. १५ दिवसांपूर्वी नालासोपारा येथून नरेंद्र मिश्रा या तरुणाचे अपहरण झाले होते. त्यावेळीही शेकडोंच्या संख्येने जमावाने तुळींज पोलीस ठाण्यावर घेराव घातला होता. पोलीस ठाण्यावर अशा प्रकारे मोर्चा काढून दबाव टाकण्याची ही प्रवृत्ती वाढू लागली आहे. पीडित व्यक्तीच्या नावाखाली समाजकंटकांकडून पोलीस ठाण्यांना लक्ष्य करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे परप्रातीयांकडूनच असे मोर्चे काढण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

शहरात परप्रांतीय भूमाफिया आणि अनैतिक धंदे करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांचा पोलिसांवर रोष असतो. त्यामुळे ते लोकांना पुढे करून मोर्चे काढून पोलिसांना लक्ष्य करत असल्याचा आरोप एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केला. काही वेळेतच मोर्चेकऱ्यांकडे पोलिसांविरोधात मोठे फलक, पत्रके येतात कुठून? पीडितांचे नातेवाईक शोकाकुल असतात, मग त्यांना ही रसद कोण पुरवते, असा सवाल त्यांनी केला.

पोलिसांविरोधातील आंदोलने

  • अंजली सरोज या चिमुकलीच्या हत्येनंतर संतप्त जमावाने तुळींज पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन घेराव घातला होता.
  • नरेंद्र मिश्रा या तरुणाच्या अपहरणप्रकरणी जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.
  • विरारमध्ये झा बंधूच्या आत्महत्येनंतर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मृतदेहच पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवण्यात आला होता.
  • सोनिया अग्रवाल या तरुणीच्या हत्येनंतरही विरार पोलीस ठाण्यावर मोर्चा आणला होता.
  • विरार पूर्वेच्या फुलपाडा येथे एका तरुणाची हत्या झाल्यानंतर संतप्त जमावाने रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर धिंगाणा घातला होता.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला छेडछाड प्रकरणावरून माणिकपूर पोलिसांनी शाहीद खान या तरुणावर गुन्हा दाखल दिला होता. त्यावेळी संतप्त जमावाने माणिकपूर पोलीस ठाण्यावरच हल्ला चढवला होता.

पोलीस ठाण्यावर मोर्चे काढणारे समाजकंटक पोलिसांच्या रडारवर आले आहेत. हे पोलिसांचे हेतुपुरस्सर खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही आता या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहोत.

रोशन राजतिलक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई