ठाण्यात प्रमुख चौकांतील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असतानाही पोलिसांकडून दुर्लक्ष

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवून त्यांना घरपोच दंडपावती पाठवण्याची वाहतूक पोलिसांची योजना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील बिघाडामुळे पाच महिन्यांपासून बंद पडली आहे. वाहनचालकांच्या हालचाली टिपण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये बसवण्यात आलेले १६ सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा सुरुवातीच्या सात महिन्यांतच बोऱ्या वाजला आहे. यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर, आता महापालिका प्रशासनाने १३ कॅमेऱ्यांची दुरुस्ती केली आहे.

ठाणे शहरातील वाहतुकीचा वाढता ताण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाने शहरात ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी आनंदनगर, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी आणि माजिवाडा या प्रमुख चौकांमध्ये १६ कॅमेरे बसविण्यात आले होते. ठाणे वाहतूक शाखेने अद्ययावत नियंत्रण कक्ष उभारून त्या कक्षाला प्रमुख चौकातील कॅमेरे जोडले होते. या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. या नियंत्रण कक्षात मोठी ‘व्हिडीओ वॉल’ उभारण्यात आली असून त्याआधारे नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम करतात. याशिवाय, या कॅमेऱ्यांच्या आधारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना    घरपोच दंडाची पावती पाठविण्याची योजना वाहतूक पोलिसांनी वर्षभरापूर्वी सुरू केली होती. परंतु वाहतूक शाखेच्या दुर्लक्षितपणामुळे शहरातील प्रमुख चौकांमधील १६ कॅमेरे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बंद असून त्याच्या दुरुस्तीबाबत महापालिकेला कळविण्याची तसदी वाहतूक पोलिसांनी घेतली नाही.

अखेर याबाबत माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन १६ पैकी १३ कॅमेऱ्यांची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली. मात्र या नियोजनशून्य कारभारामुळे बेशिस्त वाहनचालकांना घरपोच दंडपावती पाठवण्याची योजना गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. यासंदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त बी. आर. गीते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन कळवतो, असे सांगितले.

वाहतूक पोलिसांची बेफिकिरी

ठाणे वाहतूक पोलिसांना १६ सीसीटीव्ही कॅमेरे महापालिकेने उपलब्ध करून दिले होते. हे कॅमेरे बसविण्याची आणि त्यांची नियंत्रण कक्षाला जोडणी करण्याचे काम वाहतूक विभागाने केले होते. तसेच वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात व्हिडीओ वॉल उभारण्यात आली असून त्याठिकाणी कोणता कॅमेरा सुरू आहे की नाही, याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांना उपलब्ध होते. मात्र गेले चार ते पाच महिने कॅमेरे बंद असतानाही त्यांच्या दुरुस्तीबाबत वाहतूक विभागाने कोणत्याच हालचाली केल्या नाहीत. वाहनाने खांबाला धडक दिल्यामुळे काही कॅमेरे ना दुरुस्त झाले होते, तर काही ठिकाणी कॅमेऱ्याच्या वाहिन्या तुटल्या होत्या, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.