वैद्यकीय अहवालातून धक्कादायक बाब उघड

सात महिन्यांपूर्वी वसईच्या पाणजू समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळलेले पोलीस कर्मचारी विनोद पारधी यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे  वसई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विनोद पारधी (३०) हे ५ फेब्रुवारी २०१६ पासून बेपत्ता होते. दोन दिवसांनी म्हणजे  पारधी यांचा मृतदेह वसईच्या पाणजू येथील किनारपट्टीवर आढळला होता. पारधी यांनी आत्महत्या केली असल्याच्या प्राथमिक शक्यतेनंतर वसई पोलीस ठाण्यात तशी नोंद करण्यात आली होती. मात्र, पारधी यांच्या शरीरावरील जखमांमुळे पारधी यांची हत्या झाल्याचा आरोप निकटवर्तीयांनी केला होता.  या प्रकरणी शवविच्छेदन अहवालात काही निष्पन्न न झाल्याने जखमांबाबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून अहवाल मागविण्यात आला होता. या अहवालात पारधी यांच्या डोक्यावर झालेल्या जखमा आणि मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वसईचे ठाण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी सांगितले.